मोठी बातमी : वाढत्या उष्माघाताचा राज्य सरकारने घेतला धसका, शाळांना उद्यापासून सुट्टी

राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. या उष्माघाताचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिलपासून सुटटी जाहीर करण्यात येत आहे. शाळा सुरू होण्याची तारीख या आधीच जाहीर केली आहे.

मोठी बातमी : वाढत्या उष्माघाताचा राज्य सरकारने घेतला धसका, शाळांना उद्यापासून सुट्टी
DIPAK KESARKAR
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 20, 2023 | 8:52 PM

मुंबई : खारघर येथेही महाराष्ट्र भूषण पुरस्कारा वेळी 15 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावधतेने पावले टाकत आहे. राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसात ही तीव्रता अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता 21 एप्रिलपासून राज्य शिक्षणमंडळाच्या सर्व शाळांना सुटटी जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. या उष्माघाताचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिलपासून सुटटी जाहीर करण्यात येत आहे. शाळा सुरू होण्याची तारीख या आधीच जाहीर केली आहे.

राज्यात 15 जून आणि विदर्भात 30 जून या तारखांना शाळा सुरु होणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांसाठी मात्र संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी विषय वगळला नाही

केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये केवळ आठवीच्या यंदाच्या बॅचलाच गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. जे विद्यार्थी आठवीत आले त्यांच्यासाठी हा नवीन विषय आहे. त्यामुळे मराठी विषय वगळलेला नाही तर त्याला केवळ गुणांकन दिले जाणार आहे असे ते म्हणाले.

जे विद्यार्थी आठवीत आलेले आहेत. ज्यांना नव्याने मराठी अडचणीची ठरणार आहे त्यामुळे त्या एका बॅचपुरती ही सवलत देण्यात आली. त्यानंतर नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणांकन दिले जाणार आहे. त्यांनाही एक वर्षांचा अवधी दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.