BJP On Sanjay Raut : संजय राऊत साईज बघून बोला, टायगर श्रॉफ प्रकरणानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा सूचक शब्दात इशारा
BJP On Sanjay Raut : "तुमच्या आठवणीसाठी चार वर्षांपूर्वी तुमचे अडीच वर्षांसाठी सरकार होते. भाजपचा एक कार्यकर्ता आला नाही. तुम्ही त्या पक्षात राहणार का? ते सांगा. भाजपचे आमदार फोडण्याचे स्वप्न बघू नका. एक साधा कार्यकर्ता फोडता येणार नाही. आधी भांडुप मध्ये तुमचा नगरसेवक निवडून आणा"

“संजय राऊत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना जंगलराज होतं हे ते विसरलेत का?. पोलिसांमार्फत गुंडगिरी केली जात होती. पालघरमध्ये दोन साधुंची मॉब लिंचिंग झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सुशांत सिंग राजपुत, दिशा सालियन मृत्यू प्रकरण. तिचे वडील अजून न्याय मागत आहेत. सचिन वाझेने पोलिसांमार्फत एका उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब प्लांट केला. तो आरोप मुख्यमंत्र्यांवर झाला. तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती” असं उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे. “मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाले. या प्रकरणातील वाझेचे समर्थन करण्याचे काम ठाकरेंनी केले. तेव्हा वाझे काय लादेन आहेत का? असे म्हटलं. त्याला माफिया व जंगलराज म्हणतात. तुमच्या गृहमंत्र्यांनी 100 कोटींची वसुली केली. रोहित पवार, वडेट्टीवार हे विसरले” असं नवनाथ बन म्हणाले.
“जामीनावर असलेले लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह बोलले. संजय राऊत यांनी साईज बघून बोलावे. देशातील महत्त्वाच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची गणना होते. त्यांना संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाहीय तर राज्याने त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे. बोलण्याचा अधिकार दिल्याने वाईट पद्धतीने बोलणे योग्य नाही जनता धडा शिकवेल” असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले.
चार बोटे तुमच्याकडे आहेत हे विसरू नका
“गोपीनाथ मुंडे यांनी अंडरवर्ल्डला संपवण्याचं काम केलं. तुम्ही ती धमक दाखवली नाही. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिस करतील. त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. फडणवीस सरकारकडे एक बोट दाखवणारे तुम्ही चार बोटे तुमच्याकडे आहेत हे विसरू नका” असं भाजपने म्हटलं आहे. “शेकडो गुन्हे तुम्ही मुख्यमंत्री असताना केले होते. पोलिसांकडून तुम्ही हे गुन्हे करून घेतले. जंगलराजच्या गप्पा तुम्ही मारत आहात. राम नाम घ्यायला तुमच्या राज्यात बंदी होती. ते आज जंगलराजच्या बाता मारत आहेत” असं बन यांनी सांगितलं.
हे विसरू नका
“गृहमंत्री म्हणून सक्षमपणे ते सरकार चालवण्याचे काम करत आहेत. तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले होते हे विसरू नका. गृहमंत्र्यांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी कसा करतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतान पाहिले. प्रविण दरेकर, नितेश राणे यांना अटक केली होती” असं बन म्हणाले.
ठाकरेंना त्यांच्या पक्षातील चेंज कळला नाही
“लेझीममधील ताल बदलावा इतका सोपा रेजीम चेंज नाही. ठाकरेंना त्यांच्या पक्षातील चेंज कळला नाही. त्यांचा तख्त पुन्हा बदलला तरी कळले नाही. ठाकरे तुमचा सत्तापालट राऊतांनी केला. तुम्ही या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख म्हणून भाषण कराल. पण पुढच्या मेळाव्यात राऊत पक्षप्रमुख म्हणून भाषण करतील” अशी खोचक टीका भाजपने केली.
त्यावेळी कुठल्या युवराजाचे नाव आले
संजय राऊत यांच्या मानसिक संतुलनावर बोलताना बन म्हणाले की, “राऊतांच़्या गोळ्या संपल्या असतील. एक चुकीची घटना घडली. त्याचे समर्थन आम्ही करत नाही. पण तुमच्या काळात शेकडो घटना झाल्या. पोलिसांना हाताशी घेऊन पुरावे नष्ट केले. त्यावेळी कुठल्या युवराजाचे नाव आले” असा सवाल उपस्थित केला.