तुकाराम मुंढेंना नागपूर महापालिकेचे आयुक्त करा, काँग्रेसची मागणी

  • Updated On - 5:02 pm, Fri, 5 July 19 Edited By:
तुकाराम मुंढेंना नागपूर महापालिकेचे आयुक्त करा, काँग्रेसची मागणी

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : डबघाईला आलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे द्या, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे विकासकामांचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावे लागत आहेत. एकही अधिकारी जास्त काळ टिकत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

नागपूर महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. विकासकामांचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावे लागत आहेत. या स्थितीमध्ये पारदर्शक कारभार असल्याचं सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तुकाराम मुंढे यांना आणावं, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपुरात 67 हजार कोटींची विकासकामं सुरु असल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय. पण त्या विकासकामांची यादी त्यांनी द्यावी. सध्या शहरात 17 हजार कोटींची कामं सुरु आहेत, मग 50 हजार कोटी गेले कुठे? असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

विकास आणि सकारात्मक बदल हे तुकाराम मुंढे यांच्या कामाचा एकमेव सूत्र आहे. ते जिथे जातील तिथे प्रत्येक गोष्ट नियमानुसारच होणार हे ठरलेलं असतं आणि मग हे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना खपत नाही. त्यामुळेच तुकाराम मुंढेंवर याअगोदर नवी मुंबईतही अविश्वास ठराव आणण्यात आला होता. तर पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी असताना त्यांच्यावर टीका झाली. सध्या ते नाशिकमध्ये आहेत. तिथेही नगरसेवक त्यांच्या नियमाने चालण्यावर खुश नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि हा प्रश्न काही प्रमाणात मिटला. आता काँग्रेसने तुकाराम मुंढेंना नागपुरात आणण्याची मागणी केलीय खरी, पण तुकाराम मुंढे भाजपच्या नगरसेवकांना पटतील का हा खरा प्रश्न आहे.