पेणचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय म्हात्रेंचा दावा; पुढचा आमदार शिवसेनेचाच, भाजपला टक्कर देणार
आगामी विधानसभा निवडणुकीत पेणची जागा महायुतीमध्ये कोणाला मिळणार आणि शिवसेना आपले लक्ष्य साध्य करणार का ?, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या पेण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संजय म्हात्रे यांनी थेट पेण विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. आगामी निवडणुकीत पेणमधून शिवसेनेचाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी भाजपला टक्कर देण्याची भूमिका मांडली आहे. महायुतीमध्ये भाजपसोबत सत्तेत असतानाही पेणची विधानसभा जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणार असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र दळवी आणि मानसी दळवी यांनी विश्वास टाकून आपल्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. या विश्वासाला पात्र ठरून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. पेण तालुक्यात भाजपची ताकद असून सध्या या मतदारसंघाचे आमदारही भाजपचे आहेत. मात्र, शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. सुधागडमधील राजकीय यशाचा दाखला देत त्यांनी धनश्री पाटील आणि राष्ट्रवादीचे किशोर जैन यांच्यावर मात केल्याचे नमूद केले.
आमची महायुती आहे; मात्र राजकीय प्रवाह वेगाने बदलत आहे. शिवसेनेची ताकद वाढत असून, आगामी निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा दोन पावले पुढे असू. माझे ध्येय मामांचे स्वप्न पूर्ण करून पेणमधून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचे आहे.पेण, सुधागड आणि रोहा तालुक्यांतील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा सुरू करून संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तरुणांचा पक्षाकडे ओढा वाढत असून, लवकरच मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन शिवसेना झाल्या असल्या, तरी आपल्या पक्षाची ताकद कमी झाली नसून ती वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पेण विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी दोन्ही पक्षांनी समिती नेमून सर्वेक्षण करावे आणि कोणत्या पक्षाची ताकद अधिक आहे, हे तपासावे. शिवसेनेची ताकद अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यास पेणची जागा मागून घेऊ, अशी भूमिका म्हात्रे यांनी मांडली. दरम्यान, संजय म्हात्रे यांच्या नियुक्तीची घोषणा करताना आमदार महेंद्र दळवी यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. तालुकाप्रमुख पदाचे महत्त्व अधोरेखित करताना हे पद आमदाराइतकेच महत्त्वाचे असून, त्याची प्रतिष्ठा वेगळी असल्याचे दळवी म्हणाले. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे सध्या तीन आमदार असून, आगामी काळात ही संख्या पाचवर नेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार महेंद्र दळवी शिवसेनेची ताकद वाढवण्याबाबत- जिल्ह्यामध्ये आपले तीन आमदार आहेत. पाच आमदार होतील, अशी अपेक्षा आहे. संपूर्ण कोकणात शिवसेनेची ताकद आहे. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली आमदारपदे रिक्त आहेत, ( आपल्या पक्षाच्या ज्या ठिकाणी आमदार नाही त्या ठिकाणी ) त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे.
शिवसेना – भाजपात संघर्ष
पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार होणे ही काळाची गरज असल्याचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले.योग्य नियोजन आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर पेणमध्ये शिवसेनेचा आमदार सहज निवडून येऊ शकतो,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढून शिवसेनेने बहुमत मिळवल्याचा दाखला देत त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीकडे लक्ष वेधले. एकीकडे संजय म्हात्रे यांनी पेण विधानसभा मतदारसंघावर दावा करत भाजपला थेट आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार वाढवण्याचे लक्ष्य स्पष्ट केले आहे.