एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?; नसीम खान यांनी थेटच सांगितलं

| Updated on: Apr 27, 2024 | 1:28 PM

वर्षा गायकवाड माझी बहीण आहे. त्यांना माझा विरोध नाही. माझ्या कोणत्याही उमेदवाराला विरोध नाही. पक्षाने राज्यात कुठे तरी एक तरी अल्पसंख्याक उमेदवार द्यायला हवा होता. त्याबद्दल लोक मला विचारत आहेत. मी समाजाला काय उत्तर द्यावं हा माझ्या समोर प्रश्न आहे, असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी सांगितलं. नसीम खान हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?; नसीम खान यांनी थेटच सांगितलं
naseem khan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. खान यांनी आपण या पुढच्या निवडणूक टप्प्यात काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसने राज्याच एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण दुखावलो आहोत, असं नसीम खान यांनी म्हटलंय. नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना एमआयएम, महायुती आणि वंचित आघाडीने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर नसीम खान यांनी थेट भाष्य केलं आहे. वंचित आणि महायुतीची ऑफर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएमने ऑफर दिली. त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, असं नसीम खान यांना म्हटलंय.

नसीम खान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांना वंचित, महायुती आणि एमआयएमच्या ऑफरबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. बंडाचा प्रश्न नाही. आमचा पक्ष लोकशाहीवादी आहे. पक्षात कोणी चुकत असेल तर पक्षाला त्याची माहिती दिली जाते. सामाजाची भावना पाहून मी निर्णय घेतला आहे, असं सांगतानाच मला एमआयएमवर भाष्य करायचं नाही. त्यांनी सहानुभूती दर्शवली त्याबद्दल धन्यवाद. पण मला त्यावर भाष्य करायचं नाही. महायुती आणि वंचितकडून मला ऑफर आलेली नाही. कोणतीही ऑफर मला प्रेरित करणार नाही. मी सध्या काँग्रेसमध्येच आहे. राहुल गांधी आमचे नेता आहेत. सोनिया गांधी नेत्या आहेत. काँग्रेसची विचारधारा आमच्या रक्तात आहे, असं नसीम खान यांनी स्पष्ट केलं.

मी कर्मठ कार्यकर्ता

मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. मला जी जबाबदारी दिली ती पार पाडली. मला राजस्थान, गुजरात, गोवा, बंगाल, कर्नाटक, तेलंगनाची जबाबदारी दिली. ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. पक्षाला नुकसान होईल असं मी काही करणार नाही. प्रश्न माझ्या नाराजीचा नाही. मी समाजाचं नेतृत्व काँग्रेसमध्ये करतो. समाजाची जी भावना निर्माण झाली आहे. ती मी मांडली. काँग्रेस पक्ष समाजाला उमेदवारी देईल असं वाटत होतं. पण त्यांनी दिली नाही. लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे. प्रश्न नसीम खानचा नाही. मराठवाडा, मुंबई आणि विदर्भात अल्पसंख्यांक समाजाचे नेते आहेत. कुठे तरी एका जागेवर उमेदवारी द्यायला हवी होती. पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून मी बोललो. नेतृत्वाला सजग करणं ही माझी जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या पुढे प्रचार करणार नाही

नसीम खानला उमेदवारी मिळावी म्हणून नाही. तर प्रश्न समाजाचा आहे. मी समाजाचा नेता आहे. राज्यात समाज आज मला विचारत आहे. पक्षात असा का निर्णय होत आहे? त्याचं उत्तर मला लोक मागत आहेत. माझ्याकडे उत्तर नाही. मी प्रचार समितीतून राजीनामा दिल्यानंतर प्रचार करण्याचा मुद्दा नाही. मी कार्यकर्त्यांना काँग्रेसचं काम मजबूतीने करण्याचं सांगणार आहे. राहुल गांधी संविधान वाचवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.