Dahi Handi 2026 : मुंबई, ठाण्यात कोट्यवधींच्या दहीहंडीची धूम, कुठे किती लाखांचं बक्षीस?
मुंबई, ठाण्यात कोट्यवधींच्या दहीहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. या दहीहंडीसाठी सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदा पथक मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई, ठाण्यासहित इतर भागातही लाखांचं बक्षीस असलेल्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे पाऊस सुरू असताना सर्व गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत. विविध शहरात राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
दहीहंडी सणाला आता स्पर्धेचं स्वरुप आलं आहे. गोविंदा पथकाकडून यंदा नऊ किंवा दहा थर उभारण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून गोविंदा पथके दहीहंडीसाठी सराव करत होते. मुंबईसहित ठाण्यातही दहीहंडीचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी लाखोंचं बक्षीस जाहीर केलं आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाण्यात दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन केलं आहे. त्यांनी या दहीहंडी महोत्सवात तब्बल 71 लाखांच्या बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. सेलिब्रिटी दहीहंडी अशी विशेष ओळख या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीची आहे. या दहीहंडीत प्रमुख राजकीय नेत्यांसहित सेलिब्रिटी देखील हजर राहण्याची शक्यता आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांच्या दहीहंडीतून 21 लाख ते 51 लाखांपर्यंतच्या बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक यांनीही दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडीसाठी 21 लाख रुपयांची घोषणा केली. तर दिघे यांच्या समर्थकांनी टेंभी नाका येथे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. आयोजकांकडून दहीहंडी उत्सवात 11 लाख ते 25 लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहे. अविनाश जाधव यांच्या नौपाडा येथेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यात 11 लाख ते 21 लाखांपर्यंत रुपयांची बक्षिसांचं वाटप केलं जाईल.
घाटकोपरमध्ये मनसेची 51 लाखांची हंडी
मुंबईच्या घाटकोपरमध्येही मनसेच्या गणेश चुक्कल यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडी फोडण्याऱ्यांसाठी 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मनसेच्या या दहीहंडीला सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. घाटकोपरसहित वरळी, दादर, बोरिवली, चेंबूरमध्ये भव्यदिव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात पोलिसांनी 254 दहीहंडी आयोजनाला परवानगी दिली आहे.