खाजगी काम की मोठा डाव, एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात; दोन दिवसांच्या मुक्कामात काय घडणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून थेट साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. मध्यरात्री अचानक झालेल्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ते दोन दिवस येथे मुक्कामी असणार आहेत.

खाजगी काम की मोठा डाव, एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात; दोन दिवसांच्या मुक्कामात काय घडणार?
eknath shinde
| Updated on: Jun 11, 2026 | 9:36 AM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला दिल्ली दौरा आटपून अचानक साताऱ्यातील त्यांच्या महाबळेश्वरमधील दरे या मूळ गावी रवाना झाले आहे. ते दरेगावात दोन दिवसांच्या मुक्काम करणार आहे. एकनाथ शिंदे हे खाजगी कामानिमित्त याठिकाणी येत असल्याचे बोललं जात आहे. काल रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास दरे गावातील निवासस्थानी ते दाखल झाले. पुढील दोन दिवस ते गावातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीहून थेट दरे गावाकडे रवाना

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीतील आपला नियोजित दौरा संपवून विशेष विमानाने दिल्ली विमानतळावरून थेट पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यात उतरल्यानंतर तिथून त्यांनी गाडीने सातारा जिल्ह्यातील दरे गावाकडे प्रवास केला. मध्यरात्री साधारण २.३० वाजता ते त्यांच्या दरे येथील निवासस्थानी पोहोचले. अत्यंत घाईघाईने आणि अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक प्रशासनात कमालीची लगबग पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांचा अजेंडा

हा दौरा जरी खाजगी कामांसाठी असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दोन दिवसांच्या मुक्कामात दरे आणि परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. यावेळी ते महाबळेश्वर तालुक्यातील या दुर्गम भागात सुरू असलेले रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांच्या कामांचा ते आढावा घेतील.

तसेच दरे आणि आसपासच्या भागात समूह शेती (Group Farming) आणि जागतिक दर्जाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनातर्फे विविध प्रकल्प राबवले जात आहेत. या कामांच्या प्रगतीची पाहणी एकनाथ शिंदे स्वतः करणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या या गावरान दौऱ्यात ते नेहमीप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गावी मुक्काम

दरम्यान एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्ली दौरा करतात किंवा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतात, तेव्हा ते साताऱ्यातील आपल्या मूळ गावी येऊन काही काळ घालवणे पसंत करतात. येथे आल्यानंतर त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते, असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. सध्या राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका आणि इतर स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा हा दोन दिवसांचा दरे गावचा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दरे गावात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Follow Us