चाकणच्या ऐतिहासिक किल्ल्यात मोठा शोध, संग्रामदुर्ग किल्ल्यात सापडला अनमोल ऐतिहासिक ठेवा

पुण्यातील चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक ठेव्याचा शोध लागला असून उत्खननात शिव-पार्वती आणि प्रभू श्रीराम यांच्या प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.

चाकणच्या ऐतिहासिक किल्ल्यात मोठा शोध, संग्रामदुर्ग किल्ल्यात सापडला अनमोल ऐतिहासिक ठेवा
| Updated on: Nov 03, 2026 | 8:14 PM

Pune Sangram Durg Fort News : पुणे जिल्ह्यातील चाकण येथील ऐतिहासिक श्री संग्रामदुर्ग किल्ल्यावर उत्खननादरम्यान महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. या उत्खननात भगवान शिव-पार्वती आणि प्रभू श्रीराम यांच्या प्राचीन मूर्ती आढळून आल्या आहेत. या शोधामुळे पुण्यातील चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वात आणखी भर पडली असून इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुरातत्त्व विभागाकडून पाहणी

Loading...

चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील उत्खननादरम्यान आढळलेल्या या प्राचीन मूर्तींची पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उत्खननस्थळाची तसेच सापडलेल्या मूर्तींची पाहणी केली. या शोधामुळे किल्ल्याच्या इतिहासातील काही महत्त्वाचे पैलू उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतिहासप्रेमींची उपस्थिती

या पाहणीदरम्यान किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. किरण झिंजुरके यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी उपस्थित होते. संग्रामदुर्ग किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा शोध महत्त्वाचा मानला जात आहे.

मूर्ती श्री दामोदर मंदिरात ठेवल्या

उत्खननात सापडलेल्या भगवान शिव-पार्वती आणि प्रभू श्रीराम यांच्या प्राचीन मूर्तींची पाहणी केल्यानंतर त्या श्री दामोदर मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या माध्यमातून परिसरातील प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

संग्रामदुर्गाच्या इतिहासावर पडणार नवा प्रकाश

चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्या शौर्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्याच्या उत्खननात प्राचीन मूर्ती सापडणे ही महत्त्वाची बाब आहे.

या शोधामुळे संग्रामदुर्ग किल्ल्यावरील मातीत दडलेला इतिहास नव्याने समोर येत आहे. या मूर्तींचा नेमका कालखंड, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचा किल्ल्याशी असलेला संबंध याबाबत पुढील पुरातत्त्वीय अभ्यासातून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चाकणच्या ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ही मृर्ती पाहण्यासाठी देखील अनेक शिवप्रेमी गर्दी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us