मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, 5 आमदारांसह एका खासदारासोबत महत्त्वाची खलबतं
Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरमधील 5 आमदार आणि एक खासदार उपस्थित राहणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीवरून अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी पहायला मिळत आहे. जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने जास्त जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरमधील 5 आमदार आणि एक खासदार उपस्थित राहणार आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार ते जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक
समोर आलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेचे 5 आमदार आणि एका खासदाराची बैठक होणार आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर मधील राजकारणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकी भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या हातून जिल्हा परिषद व महानगरपालिका गेल्यानंतर आता विधानपरिषदची उमेदवारी ही भाजपाचा वाट्याला गेली आहे, यावर चर्चा होणार आहे.
समीर सत्तार यांच्या उमेदवारीवर निर्णय होणार
आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यावरही चर्चा होणार आहे. युतीधर्म पाळला जात नसल्याच्या मुद्द्यावर काही आमदारांकडून नाराजी मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची स्वतंत्र ताकद आणि भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्या मुलाने विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर निर्णय होणार आहे.
कोण-कोण हजर राहणार?
आजच्या या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवरही चर्चा होणार आहे. अब्दुल सत्तार यांची संजय शिरसाठ यांच्यावरील नाराजी तसेच उपमहापौर राजेंद्र जंजाळ व संजय शिरसाठ यांच्यातील राजकीय वाद यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आमदार मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे व आमदार प्रदीप जैस्वाल (आजारी असल्याने गैरहजर राहण्याची शक्यता) उपमहापौर राजेंद्र जंजाळ त्यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.