Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तंबी देताच वातावरण बदललं, मतभेद, वादविवाद बाजूला ठेऊन सगळे शिवसेना नेते आले एकत्र
Eknath Shinde : दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना आमदार, खासदारांची बैठक घेतली होती. काही तास ही बैठक चालली होती. आता या बैठकीचा परिणाम दिसू लागला आहे. सगळे शिवसेना नेते एकत्र आलेत.

छत्रपती संभाजी नगरमधील विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत मतभेद निर्माण झाले होते. कारण ही जागा भाजपकडे गेल्यानंतरही अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांनी युती धर्माचं पालन करण्याची आठवण करुन दिल्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. छत्रपती संभाजी नगर एकवेळ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. पण आज इथली जिल्हा परिषद आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेनेची पिछेहाट व्हायला अनेक कारण आहेत. एक म्हणजे शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, वादविवाद. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील महापौर निवासस्थानी संभाजी नगरमधील सर्व प्रमुख शिवसेना नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीनंतर शिवसेनेतील वातावरण बदलल्याच दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेत्यांमध्ये एकोपा दिसून येत आहे. “जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात आज आम्ही जाऊन फॉर्म भरणार आहोत. काल भाजपने जाऊन काही ठिकाणी फॉर्म भरले आहेत. आज शेवटचा दिवस आहे सगळ्यांचे फॉर्म भरणे आज तीन वाजेपर्यंत पूर्ण होईल. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीची बैठक पार पडेल. 23 तारखेच्या पूर्वी युतीच्या बोलण्या पूर्ण होतील. जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
सगळेजण एका रांगेत
“महायुती आम्ही एकत्रित लढणार आहोत यात कोणताही वाद नाही. फॉर्म विड्रॉल झाल्यानंतर आम्ही अंतिम चर्चा करू. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर यापूर्वी आमचं वर्चस्व होतं” असं शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिला तो पाळण्याचा काम आम्ही करतो आहोत. सगळेजण एका रांगेत बसले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गाडीत बसून अब्दुल सत्तार जिल्हा बँकेकडे रवाना झाले. “आमचा सगळा वाद-विवाद मिटला आहे. एकनाथ शिंदेंना आदेश दिले आहेत ते आम्हाला पालन करायचेत” असं सत्तार म्हणाले.
प्लान काय आहे?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 20 संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. आमदार अब्दुल सत्तार, आमदार संजना जाधव खासदार भुमरे यांच्या कार्यालयात आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजयना जाधव, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर एकत्र दिसत आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन तंबी दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे संभाजीनगर मध्ये सर्व नेते एकत्र दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी संदीपान भुमरे महिन्यातून एकदा आणि तर एकनाथ शिंदे तीन महिन्यातून एकदा बैठक घेणार आहे.