आम्ही 72 हजार देऊ, लोक त्यातून खरेदी करतील आणि रोजगार वाढेल : राहुल गांधी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:45 PM, 26 Apr 2019

संगमनेर, अहमदनगर : भाजपने आश्वासन दिलेल्या 15 लाखांचं काय, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. शिवाय काँग्रेसने आश्वासन दिलेल्या न्याय योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल, त्याबाबतही त्यांनी विश्लेषण केलं. काँग्रेसने जाहीर केलेले 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेचं नुकसान नाही, तर फायदाच करतील, असा दावा राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींची नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये सभा झाली. सभेला उशिरा पोहोचल्यामुळे राहुल गांधींनी जनतेची माफी मागतिली. विमानात तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधींच्या दिवसभरातील सर्व सभांना उशिर झाला. परिणामी त्यांना संगमनेरमध्येही नियोजित वेळेत पोहोचता आलं नाही.

“72 हजार रुपये अर्थव्यवस्थेला बूस्ट देतील”

काँग्रेसने जाहीर केलेले 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेसाठी इंधन असतील. मोदींनी नोटाबंदी करुन लोकांच्या खिशातला पैसा बँकात टाकला. त्यामुळे खरेदी कमी झाली, उत्पादन घटलं आणि रोजगार गेले. पण काँग्रेसने सत्ता आल्यानंतर 72 हजार रुपये दिल्यास लोक त्या पैशातून खरेदी करतील, त्यामुळे मागणी वाढेल आणि रोजगार वाढतील. अर्थतज्ञांनी याबाबत माहिती दिली, असा दावा राहुल गांधींनी केलाय. शिवाय काँग्रेसची ही योजना अर्थव्यवस्थेसाठी एक इंधन असून बूस्ट देईल, असं ते म्हणाले.

भाजपने 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं. पण तो एक जुमला होता, हे त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलं. आम्ही 15 लाख देणार नाही, पण देशातील 25 कोटी जनतेला 72 हजार रुपये देऊ. यातून सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. काँग्रेस फक्त आश्वासन देत नाही, ते पूर्ण करते, आम्ही थेट जनतेच्या खात्यात पैसे टाकू, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

VIDEO : राहुल गांधींचं संपूर्ण भाषण