आठवणींच्या अश्रूंनी हंबरडा फोडला, गिरगावला अभिमानाचा हुंदका देऊन सुरज निघाला!

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गिरगावमध्ये, आज अभिमानाचा हुंदका आणि आठवणींचे अश्रू दाटून आले. गावातील अवघ्या 23 वर्षीय कोवळ्या जवानांचं, आसाममध्ये ड्युटीवर असताना निधन झालं. सुरज साताप्पा मस्कर असं या वीराचं नाव आहे. सुरज देशसेवा बजावत असतानाच, 23 मार्च रोजी त्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुरजच्या निधनाचं वृत्त समजताच आख्खं …

आठवणींच्या अश्रूंनी हंबरडा फोडला, गिरगावला अभिमानाचा हुंदका देऊन सुरज निघाला!

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या गिरगावमध्ये, आज अभिमानाचा हुंदका आणि आठवणींचे अश्रू दाटून आले. गावातील अवघ्या 23 वर्षीय कोवळ्या जवानांचं, आसाममध्ये ड्युटीवर असताना निधन झालं. सुरज साताप्पा मस्कर असं या वीराचं नाव आहे. सुरज देशसेवा बजावत असतानाच, 23 मार्च रोजी त्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुरजच्या निधनाचं वृत्त समजताच आख्खं गाव स्तब्ध झालं. गेल्या 60 वर्षांपासून सैनिकी परंपरा असलेल्या या गावात आज सकाळी सुरजचं पार्थिव आलं आणि गावकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला.

गेल्या तीन दिवसापासून गिरगावातील प्रत्येक घरात शांतता आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. घरातीलच माणूस गेल्याची भावना प्रत्येकाची आहे. दुर्दैवी योगायोग म्हणजे सुरज सैन्यात भरती होऊन आजच चार वर्ष पूर्ण होत असताना, त्याचं पार्थिव आज गावात आलं.  तीन दिवसांपासून सुरजच्या पार्थिवाची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना आज या वीरपुत्राचं पार्थिव दिसताच, अश्रू रोखणं कठीण झालं.

सुरज आसाममधील डिंजाल इथे शहीद दिन अर्थात 23 मार्च रोजी सुरज पहाटे सहकाऱ्यांसोबत देशसेवा बजावत होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली.

आख्या गावाला सैनिकी परंपरा आहे. सूरजच्या मस्कर कुटुंबानेही देशसेवा बजावली आहे. सूरजचा लहान भाऊ सैन्यात आहे, तर त्याचे वडील आणि आजोबाही देशसेवा बजावून परतले आहेत. सुरजचं लग्न होऊन दीड-दोन वर्ष झाले आहेत. त्याच्या मागे 8 महिन्यांची निरागस चिमुकली आहे.

सुरज एक महिन्याची सुट्टी संपवून 10 मार्चला पुन्हा सेवेत रुजु झाला होता. सध्या आसाममधील डिंजाल इथे कार्यरत होता. गिरगावने गेल्या 60 वर्षात अनेक सैनिक दिले, पण अशा पद्धतीने गावातील जवानाचा पहिल्यांदाच मृत्यू झाला.

गावगाडा थांबला

दरम्यान, सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सुरजचं पार्थिव गावात येणार असल्याने, या वीरपुत्राचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गावगाडा आज आपोआप थांबला. गावातील सर्व व्यवहार तर थांबलेच, शिवाय आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांनीही या वीरपुत्राच्या दर्शनाला गर्दी केली.

प्रत्येकाचं व्हॉट्सअप स्टेटस बदललं

गावातील प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये आज सुरजचे फोटो दिसत आहेत. व्हॉट्सअप असो किंवा फेसबुक, प्रत्येकाचा प्रोफाईल फोटो आज सुरजच्या फोटोंनी भरले आहेत. प्रत्येकाला आज सुरजचा अभिमान आहे. कुणाचा मित्र, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचा बाप आज आपल्यातून गेला आहे. मात्र आपलंच कुणी गेल्याची भावना गिरगावच्या प्रत्येक नागरिकाची आहे. आख्ख्या गावाला अभिमानाचा हुंदका देऊन जाणाऱ्या सुरजला, देशाच्या या वीर जवानाला टीव्ही 9 मराठीची श्रद्धांजली!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *