Latur : पाणी तेरा रंग कैसा..? लातुरकरांना पुन्हा गढूळ पाणी पुरवठा

| Updated on: May 09, 2022 | 1:09 PM

लातूर शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरविले जात आहे. याविरोधात भाजपाच्या वतीने मनपावर मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान नागरिकांनी घरच्या नळाला जे पिवळसर पाणी येतंय ते घेऊन येण्याचे आवाहन केले होते. मात्र, पिवळसर पाणी काही नळाला आले पण पाण्याला पिवळा रंग आणण्यासाठी काहींनी हळदीचा वापर केला. तेव्हा विऱोधकांचेही भांडे फुटले.

Latur : पाणी तेरा रंग कैसा..? लातुरकरांना पुन्हा गढूळ पाणी पुरवठा
लातूर शहरात अशाप्रकारे गढूळ पाणी पुरवठा होत आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : कधी नव्हे ते लातूर शहराला (Water Supply) पाणीपुरवठा करणाऱ्या (Manjra Dam) मांजरा धरणात यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे लातुरकरांना पाणी टंचाईचे संकट नाही पण ज्यापध्दतीने हा पाणी पुरवठा होतोय त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या तीन आठवड्यापासून शहरातील नळाला गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात विरोधकांनी (MNP) मनपावर मोर्चा काढला शिवाय यातून विरोधकांची स्टंटबाजीही समोर आली पण आजही गढूळ पाण्याचा विषय कायम आहे. भाजपच्या मोर्चानंतर दोन दिवस स्वच्छ पाणी मिळाले पण सोमवारपासून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे पाणी असूनही अडचण अन् नसूनही खोळंबा अशीच अवस्था लातुरकरांची झाली आहे.

राजकीय रंगानंतरही पाण्याला पिवळा रंग कायमच

लातूर शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरविले जात आहे. याविरोधात भाजपाच्या वतीने मनपावर मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान नागरिकांनी घरच्या नळाला जे पिवळसर पाणी येतंय ते घेऊन येण्याचे आवाहन केले होते. मात्र, पिवळसर पाणी काही नळाला आले पण पाण्याला पिवळा रंग आणण्यासाठी काहींनी हळदीचा वापर केला. तेव्हा विऱोधकांचेही भांडे फुटले. पाण्यावरुन एवढे राजकारण झाल्यानंतरही सोमवारी पुन्हा नळाला गढूळ पाणी आले होते.

जलशुध्दीकरणाचीही दुरुस्ती

मांजरा धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रात आणि तेथील प्रक्रिया पार पडल्यानंतर लातुरकरांना पुरवठा अशीच प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, अशुध्द आणि पिवळसर पाणी नळाला येत असल्याच्या तक्रारी ह्या वाढत गेल्या. त्यामुळे हरंगूळ येथील जलशुध्दीकरणाची पाहणी करुन दुरुस्तीतेही काम करण्यात आले होते. असे असतानाही अधूनधून अशुध्द पाणीपुरवठा होत आहे.

मनपा प्रशासनाचा भर सुरळीत पाणी पुरवठ्यावर

मध्यंतरी काही दिवस पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यामुळे महापौर यांच्यासह मनपातील प्रशासन यंत्रणेने जलशुध्दीकेंद्रावरील दुरुस्तीचे काम केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा पिवळसर पाण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. ज्याप्रमाणे लातुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाच सोशल मिडियावरही लातूरच्या पाणीप्रश्नाचा विषय मोठे चर्चेचा बनला आहे. त्यामुळे आता नेमते कसले पाणी नळाला येणार हे पहावे लागणार आहे.