स्कूल बससह नऊ गाड्या, शेती, मठ आणि 12 बँकेत खाती… शांतिगिरी महाराज 38 कोटींचे ‘स्वामी’

| Updated on: Apr 27, 2024 | 2:26 PM

नाशिक लोकसभा मतदारसंघात अजूनही म्हणावी तशी रणधुमाळी निर्माण झालेली नाही. महायुतीने या मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शिंदे गटाचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे शिंदे गटाने नाशिकवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा अजून कायम आहे. त्यातच शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने नाशिकमध्ये टफ फाईट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्कूल बससह नऊ गाड्या, शेती, मठ आणि 12 बँकेत खाती... शांतिगिरी महाराज 38 कोटींचे स्वामी
Shantigiri Maharaj
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला आहे. त्यांना महायुतीकडून लढायचं होतं. तसे प्रयत्नही केले होते. पण महायुतीकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे शांतिगिरी महाराज यांची लढत महायुतीतील कोणत्या नेत्याशी होणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची मालमत्ताही समोर आली आहे. महाराज यांच्याकडे 9 गाड्या आहेत. मठ आणि गुरुकुल आहेत. एकूण 38 कोटींचे ते स्वामी असल्याचं दिसून आलं आहे.

शांतिगिरी महाराजांकडे एकूण 38 कोटी 81 लाख 53 हजार 339 रुपयांची मालमत्ता आहे. शांतिगिरी महाराजांकडे 50 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत. त्यामध्ये टाटा सफारी कारसह दुचाकी, डंपर, स्कूलबस आणि मालवाहू वाहने आहेत. त्याची एकूण किंमत 67 लाख 91 हजार 486 रुपये इतकी आहे.

बारा बँकेत खाती

शांतिगिरी महाराज यांनी एलआयसी पॉलिसीत दोन लाख 40 हजार 870 रुपयांची गुंतवणूक केली आहे. संभाजीनगरमधील एका बँकेचा 3 हजार 750 रुपयांचा आणि नाशिकमधील एका बँकेत 12 हजार 100 रुपयांचे शेअर्स आहेत. शांतिगिरी महाराजांचे एकूण बारा बँकेत खाती आहेत. त्यातील एकूण रक्कम 70 हजार 458 रुपये आहे. त्यांच्याकडे 71 लाख 68 हजार 664 रुपयांची जंगम मालमत्ताही असल्याचं आढळून आलं आहे. महाराजांकडील मालमत्तेत मठ, गुरूकुल आणि शेतीचाही समावेश आहे.

अर्ज मागे घेणार

दरम्यान, कालच अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. महायुतीकडून शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. शांतिगिरी महाराज यांनी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असं आवाहन अजय बोरस्ते यांनी केलं आहे. बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येण्याची विनंतीही त्यांना केली आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराज आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

दरम्यान, भाजपने आज एक मोठी कारवाई केली आहे. भाजप पदाधिकारी योगेश बोर्डे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणे आणि पक्षाला वेठीस धरण्याचे काम केल्याने त्यांच्या हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून बोर्डे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी सांगितलं. कालच त्यांनी भारती पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपला राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे.