महाविकास आघाडीचं भाजपसोबत फिक्सिंग, किती जागांवर मिलीभगत?; प्रकाश आंबेडकर यांचा सनसनाटी आरोप काय?

| Updated on: Apr 12, 2024 | 3:03 PM

जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. 30 टक्के मराठा मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे. अन् मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचं भाजपसोबत फिक्सिंग, किती जागांवर मिलीभगत?; प्रकाश आंबेडकर यांचा सनसनाटी आरोप काय?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास सनसनाटी आरोप केला आहे. महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागांवर फिक्सिंग केल्याचा गंभीर आणि सनसनाटी आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणायासह 20 जागांवर महाविकास आघाडीने फिक्सिंग केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सनसनाटी आरोप केला. यावेळी त्यांनी कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना चांगलंच फटकारलं. शाहू महाराज कोण आहे, त्यांचं कुटुंब कोण आहे, त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे, हे जगाने मान्य केलं आहे. त्यामुळे त्यावर दोन गाढवांनी कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावं असं मला वाटत नाही, असा हल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी चढवला आहे.

ओबीसी आणि जरांगे फॅक्टर काम करणार

निवडणूक निकाल काय लागेल असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आताच लावता येणार नाही. कारण या निवडणुकीवर मनोज जरांगे आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. 30 टक्के मराठा मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे. अन् मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मध्यंतरी जी आंदोलने झाली, त्यामुळे ओबीसी राजकीयदृष्टीने जागृत झाला आहे. म्हणून त्याने बलाढ्य मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

वंचितच्या नादी लागू नका

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली होती. निवडणुकीत जागांचा समझोता होतो. महाविकास आघाडीत जागा वाटप झालं नव्हतं. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये. आम्ही जर सर्व बाहेर काढलं तर काही लोकांना पब्लिकली बाहेर फिरणं कठिण होईल. वंचितच्या नादी लागू नका. कपडे फाडण्यात आम्ही एक्स्पर्ट आहोत, असा इशाराच आंबेडकरांनी दिला होता.

आज नाना पटोलेंच्या बालेकिल्ल्यात

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांची तोफ आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची आज भंडाऱ्यात प्रचार सभा होत आहे. सायंकाळी होणाऱ्या सभेतून प्रकाश आंबेडकर नानांसह कोणावर तोफ डागतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.