Weather Update : नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल…हवामानात मोठा उलटफेर; वाचा नवा अंदाज!

Weather Update : पावसाने अचानक दांडी मारल्यामुळे राज्यात उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्तवर पोहोचला आहे. हवामानात मोठा उलटफेर झाल्याचे समोर आले आहे.

Weather Update : नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल...हवामानात मोठा उलटफेर; वाचा नवा अंदाज!
Heat Wave
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 2:52 PM

राज्यात पावसाने दिलेली लांब दडी बळीराजाला मोठ्या संकटात टाकत आहे. महाराष्ट्रभर दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. पावसाची चिन्हे दिसत नसताना सप्टेंबरअखेर उकाडा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचे संकेतही विभागाने दिले आहेत. सध्या अनेक जिल्ह्यांत वाढत्या उष्णतेमुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे.

एकट्या नाशिक जिल्ह्यात या महिन्यात पावसाची तब्बल ७० टक्के तूट नोंदवली गेली आहे. गेल्या १५ दिवसांत कमाल तापमानात सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३५.८ अंश तापमान नोंदवले गेले असून, हे सप्टेंबरमधील मागील २५ वर्षांतील उच्चांक आहे. शहरातील तापमान सातत्याने ३० अंशांच्या पुढे असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

Loading...

रविवारी राज्यातील चार जिल्ह्यांत तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेले. सोलापूर आणि अमरावतीत ३६ अंश तर अकोल्यात ३५.४ अंश तापमान नोंदवले गेले. येत्या काळातही तापमान वाढत राहण्याचे संकेत असल्याने नागरिकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागत आहे.

काही ठिकाणी पुराचा कहर

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमधील पूरपरिस्थिती सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. गावात शिरलेले पाणी ओसरले असले तरी पर्लकोटा नदीच्या पुलावर अद्याप चार फूट पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड हा राष्ट्रीय मार्ग बंद आहे. पूर पूर्णपणे ओसरण्याची नागरिकांना वाट पाहत आहेत.

गोसेखुर्द धरणात ७६%, बावनथडी प्रकल्पात अवघा ३६.७०% पाणीसाठा

पावसाळा संपत आला असतानाही भंडारा जिल्ह्यातील जलसाठा सरासरीपेक्षा कमी असल्याने येत्या काळात जलसंकट उभे राहण्याची चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात केवळ ७६% तर बावनथडी प्रकल्पात अवघा ३६.७०% पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा यांसह चार मध्यम प्रकल्पांमध्ये ५९.७०% आणि ३१ लघु प्रकल्पांमध्ये ६८.८९% पाणीसाठा नोंदवला गेला आहे. २८ मायनर मालगुजारी तलावांमध्ये ७९.३०% पाणी उपलब्ध आहे. खरीप हंगामातच ही परिस्थिती असल्याने येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us