महायुतीत ‘या’ 2 जागांचा तिढा सुटता सुटेना, नेमकी परिस्थिती काय, मतदारसंघांचा इतिहास काय?

| Updated on: Apr 14, 2024 | 9:57 PM

महायुतीतील नाशिक, संभाजीनगराचा तिढा अजूनही सुटलेला नाही. नाशिक मतदारसंघावर अजूनही महायुतीतील तिन्ही पक्षाकडून दावा सांगण्यात येतोय. तर संभाजीनगरात भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा? हे देखील अजून निश्चित झालेलं नाही.

महायुतीत या 2 जागांचा तिढा सुटता सुटेना, नेमकी परिस्थिती काय, मतदारसंघांचा इतिहास काय?
महायुती
Follow us on

महायुतीतील नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान या मतदारसंघावरून अजूनही महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचाच असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील नाशिकवर आपल्या पक्षाचा दावा सांगितलाय. नाशिक मतदारसंघातून महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केलीय. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. मविआकडून नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, महायुतीकडून नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचेच अजय बोरस्ते, भाजपचे दिनकर पाटील आणि राहुल ढिकले, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळांच्या नावाची देखील चर्चा होती, असं खासदार प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय. मात्र, भुजबळांना तिकीट देणं महायुतीसाठी घातक ठरणार असल्याचं विधान भाजपच्या दिनकर पाटलांनी केलंय. तर ‘अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे’, असं छगन भुजबळ याआधी म्हणाले आहेत.

नाशिक लोकसभेत सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी हे ६ मतदारसंघ येतात. 2019 ला नाशिकची लोकसभा शिवसेनेच्या हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांमध्ये झाली होती. गोडसेंना 5,63,599 तर भुजबळांना 2,71,395 मतं पडली होती. गोडसेंनी 2 लाख 92 हजार मतांनी समीर भुजबळांचा पराभव केला होता. विधानसभेच्या सहाच्या-सहा जागांवर शिवसेनेचे गोडसे लीडवर होते.

  • सिन्नरमध्ये गोडसेंना 25,734 चं लीड होतं
  • नाशिक पूर्वमध्ये गोडसेंना 76,268 लीड होतं
  • नाशिक मध्यमध्ये 37,970 मतांचं लीड…
  • नाशिक पश्चिमधून 1,03,823 मतांचं लीड
  • देवळालीत 40,367 मतांचं लीड
  • तर इगतुपरीत 5,452 मतांनी गोडसे लीडवर होते

संभाजीनगरच्या जागेवर तिढा

महायुतीत फक्त नाशिकच्याच जागेवरून नव्हे तर संभाजीनगरच्या जागेवरूनही तिढा आहे. संभाजीनगरमध्ये देखील महायुतीनं आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, संभाजीनगरमध्ये लवकरात लवकर उमेदवार जाहीर होणार असल्याचं मंत्री संदीपान भुमरेंनी म्हटलंय. तर पक्षानं दिलेला आदेश पाळणार असल्याचं केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले आहेत.

संभाजीनगरात महायुतीकडून कोणाला उमेदवारी?

संभाजीनगरात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आलीय. तर एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात आहेत. मात्र, महायुतीकडून संदीपान भुमरे आणि भागवत कराडांच्या नावाची चर्चा आहे. 2019मधील संभाजीनगर लोकसभेतील आकड्यांचं गणित बघितलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 3,89,042, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798 मतं पडली. यात 4 हजार 492 मतांनी जलील यांचा विजय झाला, खैरे पराभूत झाले. तर हर्षवर्धन जाधव गेमचेंझर ठरले.

2019च्या लोकसभेत कोण कोणत्या मतदारसंघातून लीडवर होतं?

गेल्यावेळी खैरे अर्थात शिवसेना कन्नड, संभाजीनगर पश्चिम आणि वैजापुरात लीडवर होती. तर इम्तियाज जलील संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व या विभागात पुढे होते. गंगापुरात हर्षवर्धन जाधवांनी लीड घेतलं होतं. नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत अजूनही तिढा कायम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक, संभाजीनगरात महायुतीचा उमेदवार कोण असेल? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.