तुम्ही काय ओबीसींना पाळणा आणि मराठ्यांना झोका बांधून दिला का? जरांगेंचा वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला

दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही. आमच्या हक्काचं द्या. आम्ही कुठे म्हणतोय ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावा? आमच्या नोंदी नुसार द्या. तेच मागतो. आम्ही कुठे त्यांचं काही मागतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुम्ही काय ओबीसींना पाळणा आणि मराठ्यांना झोका बांधून दिला का? जरांगेंचा वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला
Jarange and Wadettiwar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 31, 2026 | 11:59 AM

मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री उपोषण सोडलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. डबल ढोलकी सरकारने मराठा आणि ओबीसींच्या हातात घंटा देण्याचं काम केलं आहे, असा हल्ला विजय वडेट्टीवार यांनी चढवला. त्यावरून मनोज जरांगे यांनी जोरदार हल्ला चढवला. तुमची सत्ता असताना तुम्ही काय ओबीसींना पाळणा आणि मराठ्यांना झोका बांधून दिला होता का? तुम्ही सत्तेत असताना काय फुटाणे वाटत होता का? असा घणाघाती हल्लाच जरांगे यांनी चढवला.

मनोज जरांगे पाटील यांना हिट स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजय वडेट्टीवारांच्या आरोपांची पिसेच काढली. काँग्रेस लय ऐकेरी ढोलकी आहे का? तुमचं सरकार होतं तेव्हा काय केलं? ओबीसींचं कोणतं कल्याण केलं? ओबीसींना काय पाळणा बांधून दिला होता का? काहीही बोलायचं उगं आपलं. जे आलं त्यांच्यावर बोलायचं. तुम्ही काही ओबीसींना पाळणा बांधून दिला नाही आणि मराठ्यांना झोका बांधून दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

आपण उगाच झुंजतो

आपल्या जनतेला काही कळत नाही. ओबीसी आणि मराठ्यांना काही कळत नाही. आपण उगाच झुंजतो. आपण दोघांनी मिळून… ओबीसी आणि मराठ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. पण ते आपल्यातच वाद लावत आहेत. आपलं सुरू. मग कसं होईल ओबीसी आणि मराठ्यांचं भलं? मी तर मराठ्यांचं कल्याण करणारच आहे. त्यांना पुढे नेणार आहे, असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला.

फुटाणे वाटत होता का?

तुम्ही सत्तेत असताना काय फुटाणे वाटत होता का? तुम्ही काय ओबीसी आणि मराठ्यांचं काही भलं केलं का? काही ठरावीक नेत्यांचं भलं झालं. महायुती आणि काँग्रेस दोघांनीही मराठे आणि ओबीसींचं नुकसान केलं. मराठे आणि ओबीसींनी एकत्र आले पाहिजे आणि सरकारविरोधात लढलं पाहिजे. पण तुम्ही आमच्याच विरोधात बोंबलणार, असं ते म्हणाले.

रस्त्यावर नाही तर ओढ्यात उतर

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ढेकळात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जरांगे यांनी हाके यांच्या या इशाऱ्याची खिल्ली उडवली. तू रस्त्यावर उतर, नाही तर ओढ्यात उतर. कुठेही उतर. मला काही त्याचं घेणं नाही, असा टोला त्यांनी लगावला.

चांगल्या कामाचा शेवट नसतो

यावेळी त्यांनी कालच्या चर्चेचा तपशील दिला. सरकारने ड्राफ्ट दिला होता. अभ्यासकांकडे तो दिला. त्यांच्या सूचना घेतल्या. त्यानंतर सरकारला मान्यता दिली. सरकारला सूचना आदेश काढण्यासाठी हो तर म्हणावं लागेल. रविवार होता. सोमवारपासून सरकारचं काम सुरू होईल. दिलेल्या वेळेत काम करण्यासाठी विश्वास ठेवू. नाही केलं. तर मी आहेच ना लढायला? चांगल्या कामाला शेवट नसतो. वाईट कामाला शेवट असतो. वाईट कामाचा द एंड होतो. चांगल्या कामाला शेवट नसतो. त्यासाठी सारखं लढावं लागतं. चांगल्या कामाला शेवट नसलाही पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us