Shashikant Shinde: मित्रपक्षात नेमकं कोण कोणाचा काटा काढतंय? ऑडिओ क्लिप प्रकरणावर शशिकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

Shashikant Shinde News: ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या उलाढालीवर शशिकांत शिंदेंनी सवाल केला आहे. तसेच पाणीवाटपाच्या नियोजनावरून सरकारला इशाराही त्यांनी दिला आहे.

Shashikant Shinde: मित्रपक्षात नेमकं कोण कोणाचा काटा काढतंय? ऑडिओ क्लिप प्रकरणावर शशिकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
| Updated on: Oct 25, 2026 | 5:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कथित ऑडिओ क्लिपवरून सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही ऑडिओ क्लिप आत्ताच का बाहेर आली, मित्रपक्षांमध्ये नेमकं कोण कोणाचा काटा काढत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या क्लिपमध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा उल्लेख असल्याचे सांगत त्यातील दाव्यांची चौकशी होण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे.

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याबाबत बोललं गेल्याचं दिसत आहे. काही लोकांवर जबाबदारी देण्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे या क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांनी क्लिपमध्ये उल्लेख झालेल्या रकमेवरही प्रश्न उपस्थित केले. सत्ता टिकवण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आरोप करत ही रक्कम काही कमी नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Loading...

उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर कोणी बोलू नये, असं म्हटल्याचा संदर्भ देत शशिकांत शिंदे यांनी त्यांच्यावर दबाव आहे का, असा सवाल केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच मुख्यमंत्री ही क्लिप अडीच वर्षांपूर्वीची असल्याचं सांगत असतील, तर दुसरीकडे ती एआयच्या माध्यमातून तयार केल्याचा दावा कसा केला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांना या प्रकरणातून काय फायदा, असा सवाल करत त्यांनी क्लिपमधील नावांचा आणि दाव्यांचा संदर्भ दिला आहे.

आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. पाणीवाटपासाठी समिती असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार मोठ्या प्रमाणात पाणी सोडून घेत असल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाणीवाटप समितीला बाजूला ठेवून नियोजन केल्यास दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य सूचना द्याव्यात आणि पाणीवाटप समितीमार्फत नियोजनबद्ध पद्धतीने पाणीवाटप करावं, अशी मागणी शिंदे यांनी केली. शरद पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सरकारने कार्यवाही करावी, असंही ते म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us