आधी बॅग हिसकावली अन् नंतर…; राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप, थेट ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी, काय घडलं?
Sunil Shelke Allegation News: अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे.

राजकीय विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी ही कथित मारहाणीची घटना घडली आहे. मारहाण करून हातातील बॅग हिसकावली आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब केल्याचा सुनील गुजर यांनी दावा केला आहे. मावळ तालुक्यातील आंबळे गावातील गौणखनिज उत्खनन आणि जमिनीच्या व्यवहारावरून वाद झाल्याचा आरोप आहे. बेकायदा उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडाल्याचा सुनील गुजर यांनी दावा केला आहे.
उत्खनन प्रकरणातील कथित गैरप्रकार उघड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुनील शेळकेंनी मारहाण केल्याचा आरोप सुनील गुजरांकडून करण्यात आला आहे. यानंतर घटनेवेळी उपस्थित असलेल्या करुणा सरोदे यांनाही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा सरोदे यांनी मागणी केली आहे. तसेच या घटनेनंतर सुनील गुजर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचीही सुनील गुजर यांनी माहिती दिली आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. कार्यकर्त्यांकडून गुजर यांच्या बॅगेची तपासणी करताना धक्काबुक्की झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर गुजर आणि सरोदे यांच्यासोबत सेल्फी काढल्याचे व्हिडिओत दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बाबत आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांची अधिकृत बाजू आणि पोलिसांच्या तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.