तटकरेंचा तट तोडून आले… भरत गोगावले येताच छगन भुजबळांची टिप्पणी, थेट..
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना मोठा धक्का देण्यात आला. भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यादरम्यानच भरत गोगावले यांना पाहून छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. यादरम्यानच त्यांनी राज्यसभेसाठी इच्छा दर्शवतानाच एक अटही ठेवली. आपले मंत्रीपद समीर भुजबळांना देण्यात यावे, ही त्यांची अट होती. मात्र, काही तास ताटकळत ठेवल्यानंतर भुजबळांना धक्का देत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली. हा भुजबळांना मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जाते. भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात होते. शेवटी राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता स्वत: प्रफुल्ल पटेल भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आणि छगन भुजबळ यांना घेऊन गेले. यादरम्यान काही वेळ दोघांमध्ये चर्चा देखील झाली. छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ गाडीतून उतरताच राजेंद्र जैन यांनी असे काही केले की, उपस्थित लोक काही क्षणाकरिता आश्चर्यचकित झाले. राजेंद्र जैन यांनी खाली वाकून भुजबळांना नमस्कार केला. मलाही न्याय मिळाला, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. यादरम्यानच आता छगन भुजबळ यांनी केलेली मिश्किल टिप्पणी चांगलीच चर्चेत आली.
तटकरेंचा तट तोडून आले म्हणत भरत गोगावले यांना पाहून भुजबळांनी टिप्पणी केली. भरत गोगावले यांना फोटोसाठी पुढे या म्हणण्यात आले. यावेळी भरत गोगावले पुढे येत असतानाच भुजबळांनी म्हटले की, तटकरेंचा तट तोडून आले.. भरत गोगावले यांनी म्हटले की होते, मी कधीही फोटोत न येणारा माणूस आहे तसा..
यावेळी भरत गोगावले हे तटकरेंच्या शेजारी उभा राहिल्याचे बघायला मिळाले. भुजबळांनी केलेली मिश्किल टिप्पणी ऐकून उपस्थित हसत होते. भरत गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. उमेदवारी न मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार. मलाही हा नियम लागू करण्याची विनंती केली.