MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

| Updated on: Nov 22, 2021 | 8:55 PM

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेर संधी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र ते सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले.

MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर
Follow us on

मुंबईः विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोन नावांची घोषणा केलीय. कोल्हापुरातून सतेज पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय. तर धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणी यांना संधी मिळालीय. विशेष म्हणजे या दोन जागांवर भाजपनं आधीच उमेदवार दिलेत. कोल्हापुरातून सतेज पाटलांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिकांना रिंगणात उतरवलंय, तर धुळे-नंदुरबारमधून गौरव वाणींच्या विरोधात अमरिश पटेल मैदानात आहेत.

अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत

2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. आता पुन्हा त्यांच्यासमोर अमल महाडिकांचं आव्हान आहे.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

चंद्रशेखर बावनकुळेंना अखेर विधान परिषदेवर संधी

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेर संधी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र ते सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वीज बिल विरोधी आंदोलन यासारख्या अनेक आंदोलनांचं बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

विधानपरिषदेच्या सहा जागांवर होणार निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची  1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

♦ नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अखेरची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

♦ नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)

♦ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस-26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)

♦ मतदानाची तारीख – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)

♦ मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

♦ मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार)

♦ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार)

संबंधित बातम्या

Pradnya Satav : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

Zojila tunnel: MEIL ला मोठे यश, अखेर झोजिला बोगद्याच्या ट्युब 2 चे खोदकाम पूर्ण