Ramdas Athawale : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजाराची मदत देण्याच्या निर्णयावर रामदास आठवले असमाधानी, थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार
Ramdas Athawale : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत देण्यात येईल. या निर्णयावर रामदास आठवले असमाधानी आहेत. ते केंद्रात मंत्री आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. पण अनेक नेत्यांकडून या निर्णयावर टीका होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी दिलेली 5 हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याच्या तक्रारी येत आहेत.त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा आहेत. रामदास आठवले यांचा पक्ष महायुतीचाच भाग आहे. रामदास आठवले हे केंद्रात नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत रामदास आठवले यांना अपुरी वाटते. शेतकऱ्यांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी रामदास आठवले यांनी माहिती दिली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी वाढीव मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांनाही दिवाळीसाठी चांगली आर्थिक मदत द्यावी, अशी रामदास आठवले यांची अपेक्षा आहे. सरकारने शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मदतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
कुठले दोन हप्ते थकवले?
दरम्यान मंत्री रामदास आठवले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आता एका शेतकरी नेत्याने सुद्धा या पाच हजार रुपयाच्या मदतीवरुन वेगळा दावा केला आहे. सरकारला खिंडीत गाठण्याचा आयता मुद्दा त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत देत आहे. पण त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 4,000 रुपये थकवण्यात आले आहेत ते थकवून 5,000 रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टाच नाही तर मोठी फसवणूक आहे अशी टीका किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी केली आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळी स्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांना चारा नाही अशी अवस्था आहे.