Monsoon Update : राज्यभरात पावसाची विश्रांती; 4 ऑगस्टपर्यंत स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Jul 31, 2022 | 7:41 AM

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे सध्या राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून, येत्या चार ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने (Weather Forecast) म्हटले आहे.

Monsoon Update : राज्यभरात पावसाची विश्रांती; 4 ऑगस्टपर्यंत स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : गेले काही दिवस पावसाने (rain) धुमाकूळ घातला होता. राज्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर (flood) आला, या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. विदर्भात सर्वाधिक नुकसान झाले. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे सध्या राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून, येत्या चार ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने (Weather Forecast) म्हटले आहे. सध्या विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागातील पाऊस थांबला आहे. यंदा कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा सर्वच विभागात जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, ग्रामीण भागातील पाणवठ्यांची पाणीपातळी देखील वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

विदर्भाला पावसाचा सर्वाधिक फटका

यंदा चालू महिन्यात राज्यभरात जोरदार पाऊस पडला. या पावसाचा राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात मोठे नुकसान झाले. नद्या, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी पिकांमध्ये घुसल्याने पिके पाण्याखाली गेली. पिकांमध्ये अनेक दिवस पाणी राहिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. पुराचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसला. शेतीचे तर नुकसान झाले सोबतच घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांवर स्थलांतरीत होण्याची वेळ आली. पुराच्या पाण्यात सर्व संसारोपयोगी वस्तू देखील वाहून गेल्या. पुराच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते सध्या गडचिरोली आणि चंद्रपूरचा दौरा करून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतीच्या कामांचा वेग वाढणार

दरम्यान गेले काही दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील सर्व कामे ठप्प होती. मात्र आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. मजुरीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.