सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना, आम्हाला नाही; बच्चू कडू यांनी सुनावले

| Updated on: Mar 29, 2024 | 5:09 PM

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी राणांविरोधात माघार घेणार नसल्याचं सांगत अमरावतीतून उमेदवारही जाहीर केला आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच शिंदे गटाचे आनंदराव अडसूळही अमरावतीतून लढणार असल्याने राणा यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना, आम्हाला नाही; बच्चू कडू यांनी सुनावले
bacchu kadu
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजून बैठक झाली नाही. बच्चू कडू नावाचं वादळ आमच्या सागर बंगल्यात शमवल जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. नितेश राणे यांच्या या टोल्याला बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. बच्चू कडूंचा राजकारणात कोणी बाप नाही. सागर बंगल्याची भीती नितेश राणेंना असेल, आम्हाला नाही, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे.

बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. आमचा स्वाभिमान आहे. आम्ही बुडालो तरी चालेल, पण स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची आम्हाला सवय नाही. हम मर जाएंगे. कर जायेंगे. लेकिन ताकद से लढेंगे, असा निर्धारच बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

राणेंची रक्त तपासणी करा

खरंतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. बच्चू कडू 20 वर्षे अपक्ष लढत आहे. ना झेंडा आहे, ना नेता आहे. आमचा नेता मुंबई, दिल्लीत बसलेला नाही. आमचा नेता गावात बसलेला आहे, अशा शब्दात बच्चू कडू यांनी नितेश राणे यांना सुनावले.

कारवाई म्हणजे आंडूपांडू आहे काय?

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. पण आमचाही पक्ष आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची आहे. आमची लढत मैत्रीपूर्ण असेल. बच्चू कडू युतीचा धर्म पाळत नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला वाटत असेल तर त्यांनी खुशाल कारवाई करावी. माझ्यावर साडे तीनशे गुन्हे आहेत. बच्चू कडू कुणाला घाबरत नाही. कारवाई म्हणजे काय आंडूपांडू आहे काय? असा सवाल त्यांनी केला.

हलक्या कानाचा नाही

भाजप हा फार मोठा पक्ष आहे. मी अमरावतीत उमेदवार दिल्याने एवढ्या मोठ्या पक्षावर फार फरक पडणार नाही. नितेश राणेंसारका हलक्या कानाचा मी नाही. बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. त्यांचा बाप असू शकतो. माझा नाही. कुणाचा फोन आला, काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही. आमचा बाप शेतमजूर आहे. आम्हाला थांबवण्याची ताकद भारतात कुणात नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.