Vishakha Raut : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द, समजून घ्या ठाकरे गटाला हा मोठा धक्का का?

Vishakha Raut : आधीच मुंबई महानगरपालिकेत संख्याबळ घटलेलं असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महापौरपद भूषवलेल्या त्यांच्या एका अनुभवी नगरसेविकाला आपलं नगरसेवक पद गमवावं लागणार आहे.

Vishakha Raut : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द, समजून घ्या ठाकरे गटाला हा मोठा धक्का का?
Uddhav Thackeray-Vishakha Raut
| Updated on: Sep 05, 2026 | 7:42 AM

निवृत्ती बाबार, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. सरकारच्या नगरविकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी झाली आहे. सोमवारी सभागृहात या बाबत घोषणा होईल. विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे नगरसेवक म्हणून निवडणूक लढवता येणार नाही तसचं विद्यमान नगरसेवक पदावरही राहता येणार नाही.

याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने मध्यरात्री जारी केली. 20 ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भात 25 ऑगस्ट रोजी माहिती कळवली होती. राजपत्र काढण्याची विनंती केली होती. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर या विरोधात विशाखा राऊत हाय कोर्टात गेल्या होत्या. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. या निर्णयानंतर त्यांच्या खालोखाल निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाखा राऊत यांनी जातीचे प्रमाणपत्र 14 डिसेंबर 2025 रोजी काढलं असल्याचं समोर आलं आहे.

हा उद्धव ठाकरेंसाठी धक्का का ते समजून घ्या?

विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून नगरसेविका होत्या. हा प्रभाग ओबीसी महिलेसाठी राखीव होता. पालघर जिल्ह्यातील ओबीसी प्रमाणपत्र त्यांनी दिलं होतं. याच पालघर जात छाननी समितीने विशाखा राऊत यांचं प्रमाणपत्र रद्द केलं. विशाखा राऊत यांनी फक्त 167 मतांनी बाजी मारली होती. त्यांनी प्रिया सरवणकर गुरव यांचा पराभव केलेला. प्रिया सरवणकर एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत.

सदा सरवणकर यांच्या दोन्ही मुलांचा मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये पराभव झाला होता. दादर पश्चिम शिवाजी पार्क परिसरात 191 वॉर्ड येतो. हा भाग उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता या प्रभागात एकनाथ शिंदे शिवसेनेचा नगरसेवक येऊ शकतो. हा उद्धव ठाकरेंसाठी धक्का आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us