मध्य रेल्वेचा हलगर्जीपणा, प्रवासी तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकला, मग पुढे…

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावर लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने एक प्रवासी ३० मिनिटे अडकला. सुधीर सोनवणे नावाच्या या प्रवाशाने इमर्जन्सी बटण दाबले तरीही मदत मिळाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा प्रकार आहे, असा आरोप आहे.

मध्य रेल्वेचा हलगर्जीपणा, प्रवासी तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकला, मग पुढे...
Bhivpuri lift issue
| Updated on: Jun 18, 2025 | 3:57 PM

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. सोमवारी सकाळी लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने एक प्रवासी तब्बल अर्धा तास अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. सुधीर सोनवणे असे या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी वारंवार इमर्जन्सी बटण दाबले, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त प्रवाशांनी थेट उप-स्टेशन प्रबंधकाकडे रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानकावरील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने एक प्रवासी तब्बल २५ मिनिटं लिफ्टमध्ये अडकून राहिल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. माणगाव येथील सुधीर सोनवणे हे नेहमीप्रमाणे सकाळी लवकर मुंबईकडे निघाले. सकाळी ९:१० ते ९:३५ या वेळेत लिफ्टमध्ये अडकल्यानंतर त्यांनी इमर्जन्सी हेल्प बटण वारंवार दाबले. पण मदतीसाठी कोणीच पोहोचले नाही. घटनेच्या वेळी स्थानकावर कोणताही गार्ड किंवा कर्मचारी उपलब्ध नव्हता असा प्रवाशांचा आरोप आहे. यामुळे सोनवणे यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे कामावर पोहोचायलाही उशीर झाला.

“जर त्या ठिकाणी एखादा जेष्ठ नागरिक, महिला किंवा अपंग प्रवासी अडकला असता, तर मोठा अनर्थ झाला असता” अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली. त्यांनी ही संपूर्ण माहिती भिवपुरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोरजी गायकवाड यांना दिली असून, प्रवाशांच्या वतीने उप-स्टेशन प्रबंधकाकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या विविध घटना समोर येत असतानाही, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करून त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.