मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?

मध्य रेल्वेवर १०-११ एप्रिल २०२६ दरम्यान टिटवाळा ते वाशिंद स्थानकांदरम्यान १५ डब्यांच्या लोकल कामासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शालीमार, हावडा यांसारख्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.

मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
mumbai local
| Updated on: Apr 10, 2026 | 7:52 AM

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलवर उद्या एक विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेवर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या कसारा-कल्याण मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते वाशिंद स्थानकांदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी आणि फलाट विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने १० आणि ११ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक प्रामुख्याने १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी घेण्यात येत आहे.

ब्लॉकचा कालावधी आणि वेळ

मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री २.१० वाजता सुरू होईल. त्यानंतर पहाटे ०३.२५ वाजेपर्यंत सुरू राहील. हा रात्रकालीन ब्लॉक असल्याने मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेवर याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र उत्तर आणि दक्षिण भारतातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

१५ डब्यांच्या लोकलसाठी तयारी

मध्य रेल्वेवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता १२ डब्यांच्या गाड्या आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने आता १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी टिटवाळा आणि वाशिंद दरम्यान फलाटांची लांबी वाढवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच नवीन पॉईंट्सवर ओव्हरहेड वायर कार्यान्वित करणे आणि तांत्रिक दुरुस्ती केली जाईल. त्यासोबतच १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मार्गालगतची अतिक्रमणेही या काळात हटवण्यात येणार आहेत.

कोणकोणत्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार परिणाम

  • गाडी क्रमांक १२१०२ (शालीमार – एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस): ही गाडी वाशिंद स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल आणि तिथेच थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक १८०३० (शालीमार – एलटीटी एक्सप्रेस): या गाडीचा प्रवास आसनगाव स्थानकापर्यंत मर्यादित असेल आणि ती तिथेच थांबवली जाईल.
  • गाडी क्रमांक १२८१० (हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस): ही एक्सप्रेस आटगाव स्थानकावर थांबवण्यात येणार आहे.
  • गाडी क्रमांक २०१०४ (भटनी – एलटीटी एक्सप्रेस): ही गाडी खर्डी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक ०१०२६ (बलिया – दादर एक्सप्रेस): या गाडीचे नियंत्रण भुसावळ विभागात केले जाईल, म्हणजेच आवश्यकतेनुसार ती तिथे थांबवली जाईल.
  • गाडी क्रमांक ०११३९ (नागपूर – मडगाव विशेष एक्सप्रेस): ही विशेष गाडी देखील भुसावळ विभागात गरजेनुसार थांबवून पुढे सोडली जाईल.

मध्य रेल्वेचे आवाहन

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ब्लॉकच्या दिवशी उशिरा धावणाऱ्या इतर सर्व मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांची माहिती स्थानकांवर त्याच वेळी जाहीर करण्यात येईल. कामाच्या स्वरूपानुसार काही गाड्या अंशतः रद्द देखील केल्या जाऊ शकतात, अशी सूचनाही देण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा चौकशी खिडकीवर गाड्यांचे नेमके स्टेटस तपासावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

 

Follow Us