मुंबई लोकलचा वेग मंदावला; एसी लोकलसह 15 डब्यांच्या गाड्याही रद्द, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहा
कांदिवली कारशेडमधील तांत्रिक कामांमुळे पश्चिम रेल्वेच्या १०२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालाड-कांदिवली दरम्यान वेगमर्यादेमुळे गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांना आज मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवरील तब्बल १०२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली कारशेडमधील तांत्रिक कामे आणि मालाड-कांदिवली दरम्यानच्या वेगमर्यादेमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
अनेक फेऱ्या रद्द
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या कांदिवली कारशेडमध्ये सध्या पायाभूत सुविधांच्या देखभालीचे आणि सुरक्षिततेशी संबंधित तांत्रिक कामे सुरू आहेत. याशिवाय, कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यानच्या जलद (Fast) मार्गावर नवीन कामांमुळे वेगमर्यादा (Speed Restriction) लागू करण्यात आली आहे. गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागत असल्याने एकामागोमाग एक धावणाऱ्या गाड्यांच्या अंतरावर परिणाम झाला आहे. यामुळे परिणामी अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
सामान्य प्रवाशांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्वांनाच फटका
पश्चिम रेल्वेवर रद्द करण्यात आलेल्या १०२ फेऱ्यांमुळे सामान्य प्रवाशांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्वांनाच फटका बसला आहे. या दरम्यान १२ डब्ब्यांच्या सामान्य लोकलच्या ८३ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे उपनगरीय भागातील छोट्या स्थानकांवर गर्दी वाढली आहे. तर १५ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी सोयीच्या असणाऱ्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच उन्हाचा तडाखा आणि गर्दीपासून वाचण्यासाठी एसी लोकलचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांनाही धक्का बसला असून ५ एसी फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
या फेऱ्या रद्द झाल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या आणि विरार-बोरीवलीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर (UTS किंवा M-Indicator) गाड्यांचे अपडेट्स तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे. तसेच, शक्य असल्यास बेस्ट बस किंवा मेट्रोचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
रेल्वेला सहकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता अधिक आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि सुरक्षा दलाचा अतिरिक्त बंदोबस्त स्थानकांवर तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.
