छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भारतीय ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलचं सुवर्ण प्रमाणपत्र

| Updated on: Mar 03, 2021 | 9:09 PM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ग्रीन स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भारतीय ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलचं सुवर्ण प्रमाणपत्र
Follow us on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रमुख केंद्र, ज्या ठिकाणी रोज लाखो लोक भेट देतात, ज्या ठिकाणाहून संपूर्ण देश जोडला गेलेला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ग्रीन स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मिळालेला हा बहुमान मुंबईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणारा आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is awarded Gold Certification)

“ग्रीन स्टेशन : महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भारतीय ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलने सुवर्ण प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. या रेल्वे स्थानकाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवाशांसाठी स्मार्ट-टेक सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल आणि ऊर्जा बचतीसाठीच्या योग्य उपाययोजनांचा समावेश आहे”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.

ग्रीन इमारत कशी बनते?

– इमारतीत साफ आणि स्वच्छ हवा आणि पुरेसा सूर्याचा उजेड पोहोचायला हवा

– खिडक्यांवर थेट ऊन पडत नसावं

– परिसरात पुरेशी झाडं, बाग आणि रिकामी जागा असावी

– फवारे आणि एलईडी लाईट असावी

– कमी पाणी लागणारी झाडं असावी

– अधिकाधिक यंत्रणा ही सोलार ऊर्जेवर आधारित असावी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ओळख

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं पूर्वीचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. हे स्थानक मुंबई शहरातील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे. महत्वाची बाब म्हणजे हे स्थानक युनेस्कोचं जागतिक वारसा स्थान आणि त्याबरोबरच मध्य रेल्वेचं मुख्यालयही आहे. हे रेल्वे स्थानक 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आलं होतं. या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकारानं केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी 16 लाख 14 हजार रुपयांचं मानधन देण्यातं आलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायव्हल प्रकारातील आहे. या स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विल एलिजाबेथ हिचा पुतळा होता. मात्र, भारत सरकारच्या आदेशानुसार 1950 मध्ये या स्थानकातील ब्रिटीशांचे सर्व पुतळे हटवण्यात आले. त्यात क्विन एलिजाबेथच्या पुतळ्याचाही समावेश होता.

मार्च 1996 पर्यंत या स्थानकाचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर या स्थानकाचं नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असं करण्यात आलं. त्यानंतर 2017 मध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द जोडण्यात आला. या स्थानकावर एकूण 18 फलाट आहेत. त्यातील 1 ते 7 फलाटावरुन मुंबई लोकल गाड्या थांबतात. तर 8 ते 18 फलाटावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या मार्गस्थ होतात.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : रेल्वेनं ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं! आता मोजावे लागणार 50 रुपये

Central Railway Recruitment 2021: मुंबईत रेल्वेमध्ये 2500+ अ‍ॅप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is awarded Gold Certification