
मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लीपमध्ये ते पत्रकार परिषदेत येतात तेव्हा त्यांच्यात नेमकं काय संभाषण होतं ते दिसत आहे. संबंधित क्लिपवरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या व्हिडीओ क्लिपबद्दल सर्वत्र चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली होती, या विषयी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित व्हिडीओत ‘जास्त प्रश्नोत्तर नको’, ‘राजकीय चर्चा नको’, ‘आपण बोलून मोकळं व्हायचं’ तसेच ‘माईक चालूय’, असं हे तीनही नेते बोलताना दिसत आहेत.
“मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेसाठी आलो. यावेळी आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आपल्यात मराठा आरक्षणाबाबात जी सकारात्मक चर्चा झालीय त्यावरच आपण बोलूयात. या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय गोष्टींवर प्रतिक्रिया नको. जास्त प्रश्नोत्तर नको, अशा प्रकारची आमची चर्चा चालू होती”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
“मराठा समाज, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे जी चर्चा घडली तेवढं आपण बोलूया आणि निघूया. कुठलंही राजकीय भाष्य, राजकीय प्रश्नोत्तरे आज नको, अशाप्रकारची चर्चा आमची त्यादिवशी होती. पण आज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे लोक त्या शब्दाचं पुढचं-मागचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण तयार होईल हे दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हे लोकं मराठा समाजाबाबत किती संवेदनशील आहे ते समोर आलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण हायकोर्टातही टिकलं होतं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. ते कुणाच्या अपयशामुळे टिकू शकले नाही ते आज मी इथे बोलू इच्छित नाही. पण संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“सरकारने 3700 मराठा समाजाच्या तरुणांसाठी अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला. सरकारची आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. म्हणूनच इतिहासात पहिल्यांदाच आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.