CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलशी CNG ची स्पर्धा… पुन्हा भडकले दर, तुमच्या खिशावर किती भार?
CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीचे दर भडकले आहेत. सर्वसामान्य वाहनधारकांना आता या इंधन स्पर्धेचा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसात तब्बल 12 रुपयाने CNG मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक बेजार झाले आहेत.

CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले. त्या पाठोपाठ सीएनजीने ही दरवाढीची हाक दिली. पेट्रोल आणि डिझेलसोबत सीएनजीची दरवाढीची स्पर्धा लागल्याचे दिसते. सीएनजी दर भडकल्याने मुंबई, पुणे, नाशिकमधील कॅब सेवा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी सीएनजीचे दर दोन रुपयांनी वधारले होते. तर आज मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीचे दर भडकले. वाहनधारकांच्या खिशावर पुन्हा एकदा दरवाढीचा भार पडला आहे. त्यामुळे सीएनजी वाहतूक महागणार आहे. वाहनधारकांसह ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. तर सीएनजी पण लवकरच शंभरी गाठणार अशी शक्यता वाहनधारक वर्तवत आहेत.
पुण्यात सीएनजी दरात पुन्हा वाढ
एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपये ५० पैशांची वाढ झाली. सीएनजीचा दर ९२ रुपये २५ पैशांवरून ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलो झाला. वाढीव दर २७ मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले. इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करण्यात आल्याचे एमएनजीएलने स्पष्टीकरण दिले आहे. सीएनजी दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार आहे. रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी दोन रुपयांनी वाढले
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल – डिझेल पाठोपाठ CNG चे दर किलोमागे दोन रुपयांनी वाढले. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरातील BPCL पंपावर दर वाढले. गेल्या पंधरा दिवसात सीएनजीमध्ये तब्बल 12 रुपयाने CNG मध्ये वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे दर 112 रुपये 88 पैसे तर डिझेलचे दर 99 रुपये 50 पैसे प्रति लिटर आहे.
नाशिकमध्ये सीएनजी दर किती भडकला?
नाशिक शहरात सीएनजीच्या दरात एक रुपये 35 पैशाने वाढ झाली. नाशिक मध्ये प्रति किलो दर 96 रुपये 50 पैशांवर पोहचला. आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरासह आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली. 28 मे पासून 96 रुपये 50 पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी वाहनचालकांना 95 रुपये 15 पैसे दराने सीएनजी मिळायचे. सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे रिक्षा टॅक्सी आणि खाजगी वाहनांच्या प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.