महाराष्ट्राची दवापाणी बंद… कुठे मोर्चे तर कुठे निदर्शने, तर कुठे संताप; राज्यात केमिस्टांच्या बंदने हाल
आज महाराष्ट्रासह देशभरातील केमिस्टांनी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात संप पुकारला आहे. या देशव्यापी बंदमुळे राज्याच्या अनेक भागांत दवाखाने बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. केमिस्ट रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करत आहेत.

आज देशभरातील केमिस्टांनी बंदची वज्रमूठ आवळली आहे. आपल्या काही मागण्यांसाठी मेडिकल स्टोअर्स चालकांनी आज मेडिकल स्टोअर्स बंद ठेवले आहेत. या बंदला देशभरात कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णांची दवापाणी बंद झाली आहे. महाराष्ट्रातही केमिस्टांचा बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रातील केमिस्ट केवळ मेडिकल स्टोअर्स बंद ठेवून थांबले नाहीत. तर त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला आहे. राज्यात ठिकाठिकाणी धरणे, निदर्शने आणि संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे आज मेडिकल स्टोअर्स बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
सोलापुरात औषध विक्रेत्यांचा मोर्चा निघाला. ऑनलाइन औषध विक्री विरोधात आज सोलापूरसह देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. सोलापुरातील हुतात्मा स्मारकापासून औषध विक्रेत्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली होती. यावेळी मोठ्या संख्येने केमिस्ट सहभागी झाले होते. आज माढ्यातील ६०० तर सोलापूर जिल्हातील ८५०० हून अधिक विक्रेते दुकाने बंद करुन काळ्या फिती लावून संपात सहभागी झाले होते.
करमाळयातील औषध विक्रेत्यांनी आक्रमक होत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा औषध विक्रेत्यांनी दिला आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी करमाळयातील दोन मेडिकल खुली ठेवण्यात आल्याची माहिती औषध विक्रेत्यांनी दिली.
विक्रेते रस्त्यावर
पुण्यातील रस्ता पेठ येथील पावर हाऊस चौकात औषध विक्रेत्यांचे आंदोलन झाले. औषध विक्रेत्यांकडून आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्याकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या विरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे.
बंदला 100% प्रतिसाद
पिंपरी चिंचवड शहरातही मेडिकल बंदला 100% प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्वच भागातील मेडिकल बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऑनलाइन औषध विक्री विरोधात पुकारलेल्या या बंदमध्ये शहरातील सर्वच मेडिकल विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. आपत्कालीन औषध विक्रीची व्यवस्था औषध विक्रेत्यांनी केली असून आपत्कालीन औषध विक्रीवर कसलाही परिणाम होणार नसल्याचं विक्रेत्यांनी म्हटलं आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप.
केमिस्ट असोसिएशनचा आज राज्यव्यापीत बंद आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 4 हजाराहून अधिक मेडिकल बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल शेजारी अनेक मेडिकल आहेत. ते बंद अवस्थेत आहेत. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक गोरगरीब रुग्ण दाखल असतात. या रुग्णांना बाहेरून औषध आणावी लागतात. मात्र त्याची गैरसोय होत आहे. अनेक नातेवाईक चिठ्ठ्या घेऊन फिरत आहे. मात्र मेडिकल बंद असल्यामुळे औषध मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर काही नातेवाईक जिल्ह्यातून येत आहेत औषध घेण्यासाठी त्यांनाही औषध मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापुरात मूक मोर्चा
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केमिस्टांनी मूक मोर्चा काढला. यावेळी असंख्य केमिस्टांनी हजेरी लावली होती. या आंदोलनामुळे कोल्हापुरातील वातावरण ढवळून निघालं आहे. तसेच मागण्यांचा विचार न केल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
साताऱ्यात मूक मोर्चा
सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशव्यापीय एकदिवसीय बंद पुकारला आहे. औषध विक्रेत्यांनी कराड शहरातून काळया फिती लावून मूक मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. या बंदमध्ये सातारा जिल्ह्यातील 3200 हून अधिक घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते सहभागी झाले होते.
नंदूरबारमध्ये कडकडीत बंद
नंदुरबार जिल्ह्यात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधांच्या ऑनलाइन विक्रीच्या विरोधात एकदिवसीय मेडिकल बंद आंदोलन करण्यात आले आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. मेडिकल बंदमुळे रुग्णांनाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
रुग्णांचे हाल
देशभरात साडेबारा लाख केमिस्ट बांधवांनी आज एक दिवसीय संप पुकारला असून ऑनलाइन औषध विक्री विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. मेडिकल बांधवांच्या या संपामुळे नाशिकच्या येवल्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून मेडिकल स्टोर बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना माघारी फिरावे लागत आहे. दरम्यान या एक दिवसीय लाक्षणिक संपाची दखल न घेतल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जळगावात एल्गार
जळगाव शहरातील औषध विक्रेत्यांनी देखील बंदमध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाभरात एकूण साडेचार हजार तर जळगाव शहरात 800 औषध विक्रीची दुकाने असून या सर्वांनी संपात सहभाग घेतला. जळगाव जिल्हा अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. देशव्यापी संपामुळे जळगाव शहरातील औषध विक्रीची दुकानं सकाळपासूनच बंद असल्याचं पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्रीच्या धोरणासह वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज दिवसभर औषध विक्रीचे दुकान बंद राहणार असल्याने रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधींसाठी औषध विक्रेत्यांनी संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा…
जळगाव मधील खानदेश सेंट्रल मॉलपासून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. डोक्यावर कळ्या टोप्या घालून तसेच काळ्याफिती बांधून केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी डफडं वाजवत ऑनलाइन औषधीच्या निर्णयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून औषधे विक्रेत्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चामध्ये जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या जीएसआर २२० (ई) अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला आहे. ठाण्यात देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारक ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
मध्यरात्रीपासूनच बंद
अमरावती जिल्ह्यातील अनेक मेडिकल मध्यरात्रीपासून बंद आहेत. आज सकाळी मेडिकल असोसिएशनने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारने दखल न घेतल्यास पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कोरोना काळातील होम डिलिव्हरीचे नोटिफिकेशन सरकारने रद्द करावे, तसेच ऑनलाईन औषधी विक्री सरकारने बंद करावी, अशी मेडिकल असोसिएशनची मागणी आहे. अमरावती जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी 88 सदस्यांचे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.
बनावट औषधांविरोधात बंद
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंद पुकारला. या आंदोलनाला भंडारा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवली. जेनेरिक औषधांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची औषधे विकली जात असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली आहे.
काळ्या फिती लावून…
नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं. नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेने काळ्या फिती लावून आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. सरकारने ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काळया फिती बाधून मेडिकल दुकान चालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी भटकावं लागू नये आणि आम्ही एक दिवस बंद ठेवणार असल्याचं आम्ही आधीच जाहीर करत नागरिकांना आवश्यक औषध घेऊन ठेवण्याची विनंती केली होती, असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
नागपूर जवळपास 7 हजार घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून संपात सहभाग घेतला. शहरातील मेड प्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फोरेव्हर यासारख्या नामांकित फार्मसींसह 100 दुकाने मात्र रुग्णांसाठी सुरू होती. रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून ही दुकाने सुरू होती.
छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार चौकातील मेडिकल बंद
ऑनलाइन औषध विक्री (ई-फार्मसी) आणि इंस्टंट डिलिव्हरी ॲप्सच्या मनमानी कारभाराविरोधात ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ अर्थात AIOCD ने आज 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप करत संघटनेने सरकारकडे तातडीने कठोर नियम लागू करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार चौकासह जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स बंद होते.
2000 पेक्षा अधिक मेडिकल स्टोअर चालक संपात
संपूर्ण देशभरात आज मेडिकल स्टोअर चालकांनी एक दिवसाचा संप पुकारत ऑनलाइन औषधाची विक्री बंद करण्याची मागणी केली. या संपाला जालना शहरासह जिल्ह्यातील मेडिकल चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सहभाग नोंदवला आहे. जालना शहरातील जवळपास साडेचारशे मेडिकल चालक तर जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक मेडिकल स्टोअर चालकांनी या संपामध्ये सहभाग घेत आजचा पूर्ण दिवस मेडिकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर आपत्कालीन सेवेसाठी रुग्णांना यामधून सूट देणार असल्याच मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
300 मेडिकल असोसिएशन सहभागी
आष्टी शहर मेडिकल असोसिएशनेही आज बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात बंद पुकारला. ऑनलाइन औषधे विक्री बंद करणे, बनावट औषधापासून देश वाचवा, अव्यवसायिक डिस्काउंट बंद करावे आदी विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला. आमच्या मागण्यांची दखल सरकारने तात्काळ घेउन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पुढील बंद हा बेमुदत असेल, असा इशारा देण्यात आला आहे. या बंदमध्ये आष्टीतील 300 मेडिकल चालक सहभागी झाले होते.
कोकणात बंद
कोकणातील 4000 मेडिकल चालकांनी संपात सहभाग घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील मेडिकल दुकानदार या बंदमध्ये सहभागी झाले होते. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील ७५० मेडिकल स्टोअर्स आज बंद होते, अशी माहिती अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली.
जिल्हाभर औषध दुकाने बंद
देशव्यापी औषध विक्रेता बंदला रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील बहुतांश मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पेन, रोहा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, महाड आणि अलिबागसह जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मेडिकल सेवा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ई-फार्मसी आणि ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला असून स्थानिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असल्याची भूमिका औषध विक्रेत्यांनी मांडली आहे. अचानक झालेल्या बंदमुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे.