4 वर्षं 80 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह फ्रीजरमध्ये! ‘क्रायोनिक्स’ म्हणजे काय? मृतदेह पुन्हा जिवंत होऊ शकतो?

मालाडमधील एका क्लिनिकमध्ये 4 वर्षांपासून फ्रीजरमध्ये ठेवलेला 80 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. 'क्रायोनिक्स' तंत्रज्ञानाने भविष्यात वडिलांना जिवंत करता येईल, या आशेवर कुटुंबीयांनी तो जतन केला होता. या घटनेने खळबळ उडाली असून, क्रायोनिक्स पद्धत, तिची कायदेशीर वैधता आणि भारतात मृतदेह जतन करण्याच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

4 वर्षं 80 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह फ्रीजरमध्ये! ‘क्रायोनिक्स’ म्हणजे काय? मृतदेह पुन्हा जिवंत होऊ शकतो?
Kurar Police
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 5:19 PM

मालाडमधील कोकणी पाड्यातील एका डे-केअर क्लिनिकमध्ये एका 80 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. एका फ्रिजरमध्ये गेल्या चार वर्षापासून हा मृतदेह ठेवण्यात आला होता. आज ना उद्या तंत्रज्ञान डेव्हल्प होईल आणि आपल्या वडिलांना जिवंत करता येईल, या आशेवर हा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला होता. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. क्रायोनिक्स पद्धतीने हा मृतदेह त्यांना सुरक्षित ठेवायचा होता. नेमकी ही क्रायोनिक्स पद्धत काय आहे? त्याच्या कायदेशीर मान्यता काय आहेत? याचाच घेतलेला हा आढावा.

नेमकं काय घडलं?

एका 80 वर्षीय बुजुर्ग व्यक्तीचा 2022 मध्ये नैसर्गिक मृत्यू झाला होता. पण कुटुंबीयांचे या व्यक्तीवर निरातिशय प्रेम असल्याने त्यांना या बुजुर्ग व्यक्तीला गमवायचे नव्हते. अंतिम संस्कार केल्यानंतर ही व्यक्ती कायमची नजरेआड झाली असती. त्यामुळे त्यांचा मृतदेह त्यांना जतन करायचा होता. आज ना उद्या तंत्रज्ञान विकसित झाल्यावर आपल्या वडिलांना जिवंत करता येईल, असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी कोकणी पाड्यातील एका क्लिनिकमधील फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवला होता. मात्र, स्थानिकांकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी क्लिनिकमध्ये छापेमारी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

Loading...

चार वर्ष सुरक्षित का ठेवला?

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. मृतदेह जतन करून का ठेवला? याचं उत्तरही समोर आलं आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे घरातले सर्वच दु:खी झाले होते. सर्वांनाच हा धक्का सहन करण्यापलिकडचा होता. त्यामुळेच वडिलांना कायमचं नजरेआड करण्यापेक्षा त्यांचा मृतदेह सुरक्षित ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन रिसर्चही केलं. क्रायोनिक्सची सुविधा देणाऱ्या अमेरिकेतील काही संस्थांची माहिती त्यांना मिळाली होती.

क्रायोनिक्स काय आहे?

क्रायोनिक्स अशी टेक्निक आहे की, जिच्यात कायदेशीररित्या अत्यंत कमी तापमानात मृतदेह दीर्घकाळपर्यंत संरक्षित ठेवला जातो. जरी पेशी आणि भ्रूणांचे क्रायोप्रिझर्वेशन (अतिशीत तापमानात जतन करणे) ही वैज्ञानिकदृष्ट्या स्थापित प्रक्रिया असली, तरी मानवी मृतदेहांवर क्रायोनिक्सचा वापर अजूनही मुख्य प्रवाहातील वैज्ञानिकांकडून प्रायोगिक स्वरूपाचाच मानला जातो. मात्र, या कुटुंबाला मृतदेह जतन करायचाच होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेला मृतदेह शिफ्ट करायचा होता. अमेरिकेतील काही संस्थांशी त्यांचं सातत्याने बोलणं सुरू होतं. भारतात मृतदेह कायदेशीररित्या संरक्षित ठेवणं कायदेशीररित्या वैध आहे की नाही, याची माहितीही त्यांनी भारतातील काही वकिलांकडून घेतली होती.

घर मालकालाही माहीत नाही

गेल्या चार वर्षापासून म्हणजे 2022 पासून मृतदेह क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, क्लिनिकच्या मॅनेजमेंट आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलीस किंवा क्लिनिकच्या मालकाला याबाबतची अजिबात माहिती दिली नाही. सोमवारी रात्री पोलिसांना स्थानिकांकडून ही माहिती मिळाली. घर मालकाने ही जागा 2022मध्ये क्लिनिक चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. या क्लिनिकमध्ये काय घडलं त्याची मला काहीच माहिती नाही, असं घर मालकाने पोलिसांना सांगितलं. मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही आजारी पडलं तर आम्ही याच क्लिनिकमध्ये उपचारासाठी जात होतो, असंही त्यांनी पोलिसांना स्पष्ट केलं.

आता पोलीस काय करणार?

ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, क्लिनिक मॅनेजमेंट आणि घर मालकाचे जबाब नोंदवले आहेत. बुजुर्ग व्यक्तीवर अंतिम संस्कार कसे केले जाणार? यावर अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव या क्लिनिकबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us