म्युकरमायकोसीच्या रुग्णांनाही मोठा दिलासा, अवाजवी दर आकारता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

| Updated on: Jun 04, 2021 | 6:50 PM

राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

म्युकरमायकोसीच्या रुग्णांनाही मोठा दिलासा, अवाजवी दर आकारता येणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
म्युकरमायकोसिस
Follow us on

मुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 जून) मंजूरी दिली. दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत (Thackeray Government caps mucormycosis treatment rates for private hospitals).

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजूरी

खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत राज्यभर लागू राहील.

जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची तरतूद

संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर काय?

या निर्णयाप्रमाणे, वॉर्डमधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी 4000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 3000 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण:

अ वर्ग शहरांसाठी 7500 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 5500 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रुपये, व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 6700 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 5400 रुपये दर असेल.

अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रुपयांपासून ते 10 हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी 60 हजार रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

हेही वाचा :

नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा पेच कायम, रुग्णांसाठी 30700 इंजेक्शनची गरज

कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण, कोरोना नसलेल्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने चिंता वाढली

व्हिडीओ पाहा :

Thackeray Government caps mucormycosis treatment rates for private hospitals