‘जेवतच होता तेव्हा…’ 2 लाखांच्या आमिषाने रेहान ऊर्फ सुक्का कसा बनला शूटर, टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणात आरोपीच्या आईचा धक्कादायक खुलासा
Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणात एका मोठा खुलासा झाला आहे. आरोपी रेहान उर्फ सुक्का याच्या आईने एक मोठा खुलासा केला आहे.

Tiger Shroff Firing Case Accused Rehan Mother: अभिनेता टायगर श्रॉफवर जुहू येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाने मुंबईच नाही तर बॉलिवडू हादरले आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणात दिवसागणिक नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील शूटर आणि धडाधड गोळ्या झाडणारा आरोपी रेहान उर्फ सुक्का याच्या आईने माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. आपल्या मुलाला 2 लाख रुपयांचे आणि परदेशात नेण्याचे मोठे आमिष दाखवून गुन्हेगारी जाळ्यात ओढण्यात आल्याचा आरोप रेहानच्या आईने केला आहे. तो जेवत असताना त्याला कोणीतरी आवाज दिला आणि तो घराबाहेर पडला. पण नंतर त्याचा काहीच संपर्क झाला नाही. त्याचा मोबाईल सुद्धा स्वीच ऑफ आल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. पण रेहानचा इतिहास हा डागळलेला असल्याचे समोर आले आहे. तो नुकताच तुरूंगातून सुटून बाहेर आल्याचेही समोर येत आहे.
रेहान उर्फ सुक्का सोनीपतचा रहिवाशी
रेहान उर्फ सुक्का हा हरियाणातील सोनिपतचा रहिवासी आहे. तो इयत्ता नववीत नापास झाला. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. यापूर्वी तो बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी जेलमध्येही गेला होता. तो बाहेर आल्यानंतर वेल्डिंगचे काम शिकत होता. त्याच्या आईच्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी काही अनोळखी लोक त्याला भेटण्यासाठी घरी आले होते. त्यांनीच रेहानला हे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. या कृत्यासाठी रेहानला दोन लाख रुपये आणि परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोपही त्याच्या आईने केला. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना रेहानच्या आईने हा खुलासा केला आहे.
रविवारी टायगर श्रॉफवर गोळीबार
18 ऑक्टोबर रोजी मुंबईत टायगर श्रॉफ याच्या वाहनावर तीन आरोपींनी अगदी जवळून धडाधड गोळीबार केला. जुहू परिसरात संध्याकाळी ही घटना घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. 24 तासात या प्रकरणातील आरोपींना राजस्थानच्या कोटा येथून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ऋतिक कुमार उर्फ रोशन, रेहान उर्फ सुक्का आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे. लॉरेन्स टोळीशी संबंधित अनिल पंडित याच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर येत आहे. आरोपींना मुंबईतील रस्त्यांची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यात आले होते.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. तीन हल्लेखोरांपैकी दोघांनी टायगरच्या कारच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनी सात राऊंड फायर केले होते. त्यात टायगर आणि अजून काही जण जखमी झाले.