सीसीटीव्ही बंद केले, केबिनमध्ये बोलवलं अन् मग… नागपुरात टीसीएससारखा भयंकर कांड, नेमकं काय घडलं?

नागपूरमधील एका एनजीओमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याप्रकरणी अध्यक्ष रियाझ काझीला अटक करण्यात आली असून एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सीसीटीव्ही बंद केले, केबिनमध्ये बोलवलं अन् मग... नागपुरात टीसीएससारखा भयंकर कांड, नेमकं काय घडलं?
Nagpur crime
| Updated on: Apr 21, 2026 | 12:18 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतर, धार्मिक दबाव आणि लैंगिक शोषण यांसारखे अनेक प्रकार समोर येताना दिसत आहेत. नाशिकमधील टीसीएस प्रकरण ताजे असताना आता नागपूरमध्येही धर्मांतर, धार्मिक दबाव आणि लैंगिक शोषणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वंचित मुलांसाठी काम करण्याचा दावा करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा (NGO) अध्यक्ष रियाझ फाझिल काझी याला पोलिसांनी अटक केली आहे. या संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्र एटीएसनेही (ATS) या प्रकरणाची दखल घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी आणि फिकर फाउंडेशन या संस्थांचा सर्वेसर्वा रियाझ काझी याच्यावर त्याच्याच संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी छळाचे आरोप केले आहेत. या संस्थेची एचआर प्रमुख म्हणून काम करणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेने याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण चार महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये विनयभंग, सायबर स्टॉकिंग आणि धार्मिक सक्तीचे गंभीर पैलू समोर आले आहेत.

तक्रारीतील धक्कादायक खुलासे

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी रियाझ गेल्या दोन वर्षांपासून तिचा छळ करत होता. त्याने अनेकदा तिला केबिनमध्ये बोलावून मिठी मारणे, आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून त्याने महिलांना खासगी भेटीसाठी भाग पाडल्याचेही समोर आले आहे. केवळ लैंगिक छळच नाही, तर आरोपीने काही कर्मचाऱ्यांवर धार्मिक विधींचे पालन करण्यासाठी दबाव आणत असे. हिंदू मुलींना रोजा ठेवणे आणि नमाज पठण करण्यासाठी सक्ती केली जात होती.

या दबावामुळे अस्वस्थ होऊन अनेक कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच नोकरी सोडली आहे. तसेच महिला कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या वैयक्तिक आयुष्यावर पाळत ठेवण्यासाठी रियाझने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. त्याद्वारे तो त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना मानसिक त्रास देत असे. मानकापूर पोलिसांनी रियाझ काझीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८ (२), २९६, ३०२ (१), ३५६ (२) आणि आयटी ॲक्ट अशा विविध कलमांनुसार अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही संस्था २०१० पासून कार्यरत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या नावाखाली संस्थेला मिळणारा निधी कुठून येतो आणि त्याचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी पोलीस आणि आयटी विभाग करत आहेत. आरोपीचे कुठल्या कट्टरपंथी संघटनांशी संबंध आहेत का? आणि हे प्रकरण नाशिक टीसीएस प्रकरणासारखेच आंतरराज्य रॅकेटचा भाग आहे का? याचा तपास एटीएसकडून केला जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा आणि बनावट सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us