भोंदू बाबा अशोक खरातवर ईडीचा मोठा स्ट्राईक, तब्बल दोन गोण्या….
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि कोट्यवधींच्या मालमत्तेप्रकरणी छापेमारी करत ईडीने कागदपत्रे, रोख रक्कम आणि आलिशान कार जप्त केली आहे.

नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस अशोक खरातच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर धाडसत्र सुरु आहे. यावेळी ईडीच्या १३ सदस्यांच्या पथकाने कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित हजारो कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत दोन गोणी भरून महत्त्वाचे दस्तऐवज ईडीच्या हाती लागले आहे. यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
आर्थिक व्यवहारांची हजारो कागदपत्रे जप्त
अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करत शहरात आणि परिसरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ईडीने केलेल्या दोन दिवसांच्या सखोल छापेमारीत घर आणि कार्यालयातून अशा मालमत्तांशी संबंधित आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची हजारो कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे खरातच्या आर्थिक साम्राज्याचा भांडाफोड करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
सलग दोन दिवस नाशिक, शिर्डी आणि पुणे अशा एकूण ११ ठिकाणांवर ईडीने धडाकेबाज सर्च ऑपरेशन राबवून खरातच्या आर्थिक साम्राज्याचा भांडाफोड केला आहे. या छापेमारीत ईडीच्या हाती कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे लागले असून खरातच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. ईडीने अशोक खरातची २ कोटी ५० लाखांची बँकेतील रक्कम गोठवली आहे. तर त्याच्या मालकीची एक आलिशान मर्सिडीज बेंझ कार देखील जप्त केली आहे. याव्यतिरिक्त, अशोक खरातचा चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे याच्या पुण्यातील राहत्या घरातून ४२ लाखांची रोख रक्कम ईडीच्या पथकाने हस्तगत केली आहे.
जवळपास १० कोटींच्या मालमत्तेची ओळख पटली
अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत कागदपत्रांच्या आधारे त्याच्या जवळपास १० कोटींच्या मालमत्तेची ओळख पटली आहे. केवळ वैयक्तिक मालमत्ताच नव्हे, तर त्याने पतसंस्थेतील बोगस खात्यांद्वारे केलेल्या आर्थिक अफरातफेरीचे धागेदोरे देखील उघड झाले आहेत.
ईडी केवळ अशोक खरातवरच नव्हे, तर त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्यांवरही आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने शासकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या आपल्या संबंधांचा गैरवापर करून अनेक अवैध व्यवहार केले आहेत. आता ईडी या सर्व अधिकाऱ्यांची देखील कसून चौकशी करणार आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.