
उमेश परीक, नाशिक | धुळवडीच्या दिवशीच रात्रीच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यात (Yeola Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी तवेरा गाडी डिव्हायडरवर आदळली. यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला. तर तिघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी रुग्णांवर येवल्यातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच काहींना पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारमध्ये एकूण 8 प्रवासी असल्याची माहिती हाती आली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे ती 2 ते 3 वेळा पलटी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सागितलं.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर अहमदनगर-मनमाड महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या महामार्गावरील येवल्यातील नांदेसर चौफुलीजवळ ही घटना घडली. सदर तवेरा गाडी कोपरगाव येथून निघाली होती. कोपरगावहून मालेगाव येथे जात असताना हा अपघात झाला. या तवेरा गाडीत 8 जण प्रवास करत होते. अपघातातील सर्वचजण मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे.
येवल्यातील अपघातावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर आदळली. भरधाव वेगात असल्याने गाडी 2 ते 3 वेळा उलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अपघात होताच रस्त्यावरील इतर वाहने मदतीसाठी धावले. त्यांनी तत्काळ पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.
हा अपघात घडल्याची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दुभाजकावरच कार आदळल्याने रस्त्याच्या मधोमध ही भीषण घटना घडली. त्यामुळे नांदेसर चौफुलीजवळील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही वेळातच अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला करण्यात आले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.