Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके 1 लाखाला विकले, अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदूबाबा खरातप्रकरणात ईडीचे हादरवणारे खुलासे

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अनुयायांच्या केवायसी कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट खाती उघडणे, सामान्य वस्तूंना दैवी शक्तीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना विकणे, आणि लैंगिक शोषण करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. ईडीच्या चौकशीत ४२ कोटींच्या मालमत्तेचा खुलासा झाला असून मनी लाँड्रिंगचा संशय आहे.

Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके 1 लाखाला विकले, अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदूबाबा खरातप्रकरणात  ईडीचे हादरवणारे खुलासे
भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे उघड
| Updated on: Jul 23, 2026 | 9:44 AM

नाशिकमधील भोंदूबाबा, स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणारा लिंगपिसाट अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.भोंदूबाबा खरातविरोधात ईडीने कारवाईचा फास आवळला असून त्याच्याविरोधातलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासात चौकशी दरम्यान अनेक खुलासे ईडी तर्फे करण्यात आले आहेत. स्वयंघोषित बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा दावा केला आहे. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या अभियोग तक्रारीनुसार, खरातने आपल्या अनुयायांची फसवणूक करण्यासाठी त्यांच्या केवायसी (Know Your Customer) कागदपत्रांचा गैरवापर केला. एवढंच नव्हे तर त्याने सामान्य वस्तूंना दैवी शक्ती असल्याचा दावा करत, त्या अवाजवी किमतीत लोकांना विकल्या असाही आरोप आह. खरातचे आणखी कारनामे उघड होत असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर, उघडली बनावट खाती

ईडीच्या तक्रारीनुसार, भोंदू अशोक खरातने तीर्थयात्रेच्या बुकिंगची व्यवस्था करून देण्याच्या बहाण्याने आपल्या अनुयायांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर केवायसी (‘नो युअर कस्टमर’) कागदपत्रे जमा करून घेतली. मात्र या कागदपत्रांचा त्याने गैरवापर केला. कारण् त्याच कागदपत्रांचा वापर करून संबंधितांच्या नकळत डझनभर बँक खाती उघडण्यात आली. तपासादरम्यान दिलेल्या जबाबात या खात्यांपैकी अनेक खाती स्वतःच्या नियंत्रणाखाली असल्याचे खरातने कबूल केलं, अशी नोंद ईडीच्या अभियोग तक्रारीत करण्यात आली आहे.

100 रुपयांचे चिंचोके लाखोंना विकले

त्याने केलेली फसवणूक, कारनामे इथेच थांबत नाहीत. ईडीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार, खरातने अनुयायांना सामान्य वस्तूंमध्ये दैवी, रोगनिवारक आणि अलौकिक शक्ती असल्याचा खोटा दावा करून त्या वस्तू अवास्तव दराने विकल्या. त्यामध्ये अवघ्या सुमारे 100 रुपयांच्या चिंचेच्या बिया तब्बल 1 लाख रुपयांना विकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धा आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक लाभ मिळवल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

ईडीच्या मते, या व्यवहारांमधून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला असून त्याचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करण्यात आल्याचा संशय आहे. तपासादरम्यान मिळालेल्या कागदपत्रे, बँक व्यवहार आणि आरोपीच्या जबाबाच्या आधारे हे आरोप अभियोग तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

मात्र, आरोपी अशोक खरातने ईडीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप निराधार असून आपण कोणतीही बेकायदेशीर कृती केलेली नसल्याचा दावा त्याने केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू असून न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला खरात पुन्हा चर्चेत आला आहे. तपासादरम्यान त्याने स्वतःकडे येणाऱ्या महिलांच्या अडचणी आणि असुरक्षिततेचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले. या प्रकरणातील अनेक कथित पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी केल्या असून, महिलांसोबत गैरवर्तन करतानाचे काही कथित व्हिडिओही समोर आल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी खरातला अटक केली.

दरम्यान, तपासात त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबतही संशय निर्माण झाला. उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याच्या आरोपांची चौकशी करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केला. या तपासात सुमारे ४२ कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली. सर्व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास पूर्ण केल्यानंतर ईडीने अखेर खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Follow Us