बाळ हवं असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव..; नाशिक TCS कंपनीतल्या पीडित व्यक्तीकडून आरोपींची पोलखोल
पीडित कर्मचाऱ्याने त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगांचा खुलासा केला आहे. टीम लीडरने त्याला कलमा वाचण्यास, नमाज पठण करण्यास आणि बळजबरीने मांसाहार जेवण खाण्यास भाग पाडलं होतं.

नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचं लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून करण्यात येत आहे. नामांकित कंपनीत इतक्या दिवसांपासून असे प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. याप्रकरणी एका पीडित व्यक्तीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना मन विचलित करणारे अनुभव सांगितले आहेत. टीम लीडर्सने त्याला बळजबरीने नमाज पठण करायला, कलमा म्हणायला आणि टोपी घालायला भाग पाडल्याचा आरोप त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर पीडिताच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवत आरोपी टीम लीडरने सर्वांसमोर त्याला म्हटलं की, “उपचारानंतर तुझी पत्नी आई होऊ शकली नाही, जर बाळ हवं असेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव.” 2022 पासून हा मानसिक त्रास सुरू झाल्याचं त्याने सांगितलं.
पीडित व्यक्तीने कंपनी जॉईन केल्यानंतर टीम लीडर तौसीफ अत्तारी आणि त्याचा साथीदार दानिश शेख यांनी त्याच्यावर निशाणा साधला होता. टीम लीडर असल्याने पीडित व्यक्तीला त्याच्या सर्व गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. पीडित हिंदू होता. रामदास स्वामींचा भक्त असल्याने तो गळ्यात रुद्राक्षची माळा घालून असायचा. हीच धार्मिक ओळख तौसिफ आणि दानिशच्या डोळ्यांना खुपत असल्याचं म्हटलं गेलं. कामाच्या बाबतीतही त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता. कामादरम्यान तौसीफ आणि दानिश त्याला घेरायचे आणि हिंदू देवी-देवतांवरून त्याची खिल्ली उडवायचे. “तुमच्या हिंदू धर्मात देव आहे का? कधी पाहिलंय का? देवासारखं काहीच नसतं, फक्त अल्लाहच सत्य आहे”, असं ते म्हणायचे. पीडित व्यक्तीने सांगितलं की, देव-देवतांच्या रुपाबद्दल इतक्या अश्लील टिप्पण्या करायचे की ते कोणत्याही भक्तासाही ते ऐकणं असह्य होतं.
हा छळ केवळ शाब्दिक नव्हता, तर धमक्या देणंही त्यांच्या त्रासाचा एक भाग होता. पीडित व्यक्ती कट्टर शाकाहारी आहे, पण तौसीफ आणि दानिश त्याला ड्युटीनंतर बळजबरीने हॉटेलमध्ये घेऊन जात असत. तिथे त्याला धमक्या देऊन आणि दबाव टाकून मांसाहारी अन्न खाण्यास भाग पाडलं जात असे. 2023 च्या ईदच्या दिवशी तौसीफ त्याला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या संमतीशिवाय त्याला धार्मिक टोपी घालण्यास भाग पाडलं होतं. इतकंच नव्हे तर त्याला नमाज पठण करण्यास भाग पाडलं आणि त्याचा फोटो काढून कंपनीच्या अधिकृत ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता.
पीडित आणि त्याच्या पत्नीला लग्नानंतर अनेक वर्षांपासून मूलबाळ होत नव्हतं. यावरूनही तौसीफ आणि दानिश त्याची थट्टा करायचे. “इतके उपचार करूनही तुझी पत्नी आई होऊ शकली नाही. एक काम कर, तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव”, असं ते पीडित व्यक्तीला म्हणायचे. हे ऐकून त्याच्या संयमाचा बांधच सुटला. यावरून झालेल्या वादादरम्यान तौसीफने पीडित व्यक्तीवर टेबल फॅन फेकला आणि त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली.
2022 मध्ये सुरू झालेलं हे संपूर्ण प्रकरण 23 मार्च 2026 पर्यंत सुरूच होतं. तौसीफ, दानिश, शाहरुख आणि रझा मेमन यांच्या संपूर्ण टोळीने कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याबद्दलही अश्लील टिप्पणी करण्यास सुरुवात केली होती. पीडित व्यक्तीने जेव्हा त्यांचं म्हणणं ऐकणं थांबवलं, तेव्हा तौसीफने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी मुख्यालयात त्याच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली. अखेर पीडित व्यक्तीने कायद्याचा आधार घेतला. या प्रकरणात सामील असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणारी तक्रार त्याने दाखल केली आहे.