भुजबळ लवकरच दिल्लीत दिसणार? राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांचीही संमती?
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही उमेदवारी छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या बैठकीला हजर आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात
राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या शासकिय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवाराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात छगन भुजबळ तर राज्यात छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी या संदर्भात राष्ट्रवादीचे नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानाची बैठक संपवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी बैठकीसाठी पुन्हा पोहचले आहेत. आता या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
ही नावेही चर्चेत
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. 8 जून सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद हिंदुराव, छगन भुजबळ, अविनाश आदिक, समीर भुजबळ यांची नावेही चर्चेत आहेत, आता कुणाला राज्यसभेची लॉटरी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.