कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर सातपट, साताऱ्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढली

| Updated on: Jun 15, 2021 | 11:18 AM

कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ‘म्युकरमायकोसिस’चा (Black Fungus Mucormycosis) धोका अधिक वाढू लागला आहे. यात रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. आता सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर सातपट, साताऱ्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढली
सातारा
Follow us on

सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ‘म्युकरमायकोसिस’चा (Black Fungus Mucormycosis) धोका अधिक वाढू लागला आहे. यात रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. आता सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. तर, हा मृत्युदर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू दराच्या सातपट जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे (Black Fungus Mucormycosis death rate increases in Satara).

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 122 जणांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यातील 68 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 19 जणांचा या म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 15.57 टक्के असून, तो कोरोना बाधितांच्या मृत्यूदरापेक्षा 6.95 टक्के म्हणजेच सुमारे सातपट अधिक आहे. सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळय़ा बुरशीची लागण झालेले रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

म्युकरमायकोसिसला प्रतिबंधित करणाऱ्या इंजेक्शनची निर्मिती वाढवावी!

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केलीय. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं देखी राजेश टोपे म्हणाले होते. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी म्हटले होते.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे?

म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

म्युकरमायकोसिस सर्वाधिक धोका कोणाला?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

काळ्या बुरशीची लक्षणे

काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.

बचाव कसा करायचा?

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा

तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

(Black Fungus Mucormycosis death rate increases in Satara)

हेही वाचा :

Corona Cases In India | देशात नवे कोरोनाग्रस्त 60 हजारांच्या घरात, कोरोनाबळींतही 1200 ने घट

स्पिरीट ऑफ मुंबईकर, झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर; कोणत्या भागात किती कंटेनमेंट झोन?