Rantagiri Rain : काल सिंधुदुर्गात मुसळधार, आज रत्नागिरीत दमदार! बाप्पासाठी कोकणात पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला!

| Updated on: Aug 31, 2022 | 4:19 PM

Konkan Rain : गेल्या वर्षी चिपळूणमध्ये जुलै महिन्यात पूर आला होता. या पुराच्या जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. पुरात चिपळूणचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा चिपळूणमधील लोकांना पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळो, चिपळूणची भरभराट होवो, अशी प्रार्थना लोकांकडून बाप्पाचरणी केली जातेय.

Rantagiri Rain : काल सिंधुदुर्गात मुसळधार, आज रत्नागिरीत दमदार! बाप्पासाठी कोकणात पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला!
कोकणात पावसाची हजेरी
Image Credit source: Twitter
Follow us on

रत्नागिरी : गणपती बाप्पाचं (Ganpati Festival 2022) धूमधडाक्यात स्वागत घरोघरी झालंय. कोकणात खड्ड्यांची वाट चुकवत, मिळेल ती गाडी पडकून, सीट मिळाली नाही, तर मधल्या जागेत बसून, रजेचं विघ्न दूर करत, एकदाचे चाकरमनी कोकणात दाखलही झालेत. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासाठी ‘चाकरमनी चतुर्थीक येतलोच’, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच जणू. सालाबादप्रमाणे यंदाही तसंच झालंय. यंदा कोरोनाचं संकट काहीसं दूर झालं. त्यामुळे चतुर्थीचा उत्साह अधिक असणारच. अशातच गणेशभक्तांना खूश करण्यासाठी कोकणात दुहेरी योग दिसून आलाय. गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी चक्क वरुणराजानेही कोकणात हजेरी लावलीय. मंगळवारी सिंधुदुर्गातील (Sindhudurg Rain) बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस तासभर पडला होता. तर आज उकडीचे मोदक खाऊन गरमी पुन्हा वाढली, अशी चर्चा रंगणारच होती, की इतक्यात रत्नागिरीतही (Ratnagiri Rain) पावसाचं आगमन झालं. अचानक आलेल्या पावसाने गणेशभक्तांना सुखद धक्का दिला. रत्नागिरीच्या बहुतांश भागात पावसाच्या सरींनी वातावरण पुन्हा आल्हाददायक केलं. त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झालाय.

पावसाला चतुर्थीचा मुहूर्त

गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणात पावसाचं फारसं प्रमाण पाहायला मिळालं नव्हतं. पावसानं जणून कोकणात उघडीप घेतली होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला होता. पण अखेर आज पुन्हा एकदा चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली आहे.

हे सुद्धा वाचा

चिपळूण तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्यात. गेल्या 15 दिवसांपासून कोरडे झालेले रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते पुन्हा एकदा पावसाच्या सरींनी चिंब भिजलेत. सावर्डेसह चिपळूण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसह चाकरमनीही सुखावलेत.

बाप्पाचरणी प्रार्थना

गेल्या वर्षी चिपळूणमध्ये जुलै महिन्यात पूर आला होता. या पुराच्या जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. पुरात चिपळूणचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा चिपळूणमधील लोकांना पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळो, चिपळूणची भरभराट होवो, अशी प्रार्थना लोकांकडून बाप्पाचरणी केली जातेय.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी विक्रमी पावसाची नोंद होते. यंदाही जुलै महिन्यात मुसळधार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. काही काळ मुंबई गोवा हायवेवरील परशुराम घाटातली वाहतूकही प्रभावित झाली होती. तर सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा मार्गही बंद करण्यात आले होते. पण ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आता चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोकणात पावसाच्या सरींनी लावलेली हजेरी गणेशभक्तांना सुखावून गेलीय.