खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, हातातच बॉम्ब फुटल्याने मोठी खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गावठी बॉम्ब स्फोटाने खळबळ उडाली आहे. शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब हातात फुटल्याने 13 वर्षीय प्रणव येसरे गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारांसाठी सांगलीला हलवले आहे.

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, हातातच बॉम्ब फुटल्याने मोठी खळबळ
bomb
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 28, 2026 | 11:42 PM

रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटाच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने प्रणव प्रताप येसरे (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटामुळे कोणतंही मोठं नुकसान झालं नाही. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव हा गुरे राखण्यासाठी परिसरात गेला असताना त्याला शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब आढळून आला. उत्सुकतेपोटी तो हाताळत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की प्रणवच्या हाताला, छातीला तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली. स्फोटानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

रत्नागिरीतून सांगलीत

प्रणव येसरे याला काल रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी स्फोटके?

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून परिसराची पाहणी करण्यात आली असून फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि बॉम्बशोधक पथकाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरात आणखी स्फोटके लपवून ठेवण्यात आली आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्येही गावठी बॉम्ब हातात फुटल्याने एका महिलेचा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. अल्पावधीत जिल्ह्यात घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता व्यक्त केली जात आहे. शिकारीसाठी अशा प्रकारच्या धोकादायक गावठी बॉम्बचा वापर कोण करत आहे आणि हे स्फोटक साहित्य परिसरात कसे पोहोचत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us