शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक रमेश म्हात्रे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण, बिलावरून मोठा वाद अन्..
पालघरमध्ये मोठा राडा झालाय. शिंदे गटाच्या नेत्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवक रमेश म्हात्रे याने हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेच्या काही दिवसांनंतर आता पालघरमध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. पालघरमध्येही शिंदे गटाच्या नेत्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालघरमधील हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. बिलाच्या रकमेवरून पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याचे माहिती समोर येत आहे. या घटनेने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील रिलीफ हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अतुल घरत यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे शिवसेनेची दहीहंडी फोडताना जखमी गोविंदांवर उपचार केल्यानंतर बिलाच्या रकमेवरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्याचसोबत दमदाटी केल्याचेही सांगण्यात येत आहे.
मारहाणीच्या घटनेत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचाही आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख अतुल घरत, आमदार राजेंद्र गावीत यांचे सुपुत्र रोहित गावीत मिळून सहा जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
पालघरमधील दहीहंडी फोडताना गोविंदा पथकातील तरुण हंडी फोडण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला. त्याला तातडीने शिंदे गटाच्या कार्यालयाजवळील असलेल्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. छातीला दुखापत, डोके, मणक्याला मार लागल्याप्रकरणी जवळपास 5 रुग्णांवर उपचार सुरू होते. काही रुग्णांचे सिटी स्कॅन, एक्स रे काढण्यात आले होते. सर्व रुग्णांवर उपचार सुरू होते.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गोविंदाच्या नातेवाईकांकडून तपासणी आणि उपचाराकरिता शुल्काची मागणी करण्यात आली. त्यांच्याकडे 19866 रुपयांची मागणी केली.त्यावेळी गोविंदा पथकांनी बिलाची रक्कम जिल्हाप्रमुख देतील असे त्यांनी सांगितले. त्यावेळी आयोजकांनी 10 हजारांचा भरणा केला. काही वेळानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना सिटी स्कॅन का केला, असा सवाल केला. त्यावरून हॉस्पिटल कर्मचारी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी शिंदे गटाच्या शहर प्रमुकांनी एका कर्मचार्याच्या कानशिलात लगावली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.