पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट कंपनीत भीषण स्फोट (Palghar tara nitrate blast) झाला. या स्फोटाने 4 ते 5 किमीचा परिसर अक्षरश: हादरला.

Palghar tara nitrate blast, पालघरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू

पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट कंपनीत भीषण स्फोट (Palghar tara nitrate blast) झाला. या स्फोटाने 4 ते 5 किमीचा परिसर अक्षरश: हादरला.  या स्फोटात कंपनीतील  7 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक कर्मचारी जखमी आहेत. या स्फोटावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर तारापूर औष्णिक केंद्र, डहाणू, पालघर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात वीजपुरवठा बंद केल्याने मृतदेह शोधण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत.

कोलवडे गावानजीकच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाट नंबर M – 2, तारा नायट्रेट या कंपनीत रसायनाचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या स्फोटाच्या आवाजाने चार ते पाच किलोमीटरचा परिसर हादरला.  या स्फोटामुळे तारा नायट्रेट या कंपनीत काही कामगार अडकल्याची माहिती आहे. चार ते पाच कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

स्फोटाच्या हादऱ्यामुळे बाजूला बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. या इमारती खालीही काही कामगार अडकल्याची भीती आहे.

या कंपनीत अमोनिअम नायट्रेट हे रसायन तयार केले जात होते. या कंपनीतील स्फोट हा इतका भीषण होता की याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. सुरुवातीला या परिसरात भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र, नंतर तारा कंपनीत स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटानंतर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्ळावर पोहचले आहेत. जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून, एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *