8 मुली, 18 व्हिडीओ अन् 39….; परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट पोलिसांच्या हाती

अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, ८ पीडितांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समोर आले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याचा फ्लॅट सील केला आहे.

8 मुली, 18 व्हिडीओ अन् 39....; परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मोठी अपडेट पोलिसांच्या हाती
amravati
| Updated on: Apr 17, 2026 | 8:33 AM

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणीचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. आता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अयान अहमदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात अयानला पोलीस स्वत: केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पीडित तरुणींची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

८ पीडितांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो उघड

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीतील परतवाडा प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यांवरून आतापर्यंत ८ पीडित मुलींचे १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ फोटो समोर आले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस इतर पीडित मुलींचा शोध घेत आहेत. ज्यामुळे आरोपींच्या कृत्याचा अधिक पर्दाफाश होईल.

तसेच मुख्य आरोपी अयान अहमदने ज्या कठोरा नाका परिसरातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण केले होते, तो फ्लॅट पोलिसांनी तात्काळ सील केला आहे. पोलीस या फ्लॅटची कसून तपासणी करत आहे. आरोपी अयानला लवकरच चौकशीसाठी या ठिकाणी आणले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या या फ्लॅटच्या मालकाचीही पोलीस आता चौकशी करणार आहेत. जर फ्लॅट भाड्याने देताना मालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल किंवा त्यांची काही चूक आढळली, तर त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांची भूमिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

एकीकडे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. तर दुसरीकडे याच प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदचा वाढदिवस चक्क पोलिसांच्या उपस्थितीत त्यांना केक भरवून साजरा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या संतापजनक कृत्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us