प्रेयसीच्या हट्टासाठी चक्क मांजर चोरली

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 9:07 AM, 28 Apr 2019
प्रेयसीच्या हट्टासाठी चक्क मांजर चोरली

मुंबई : प्रेमात कोण काय करेल, याचा काही नेम नाही. नागपूरमध्ये एका प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीसाठी मांजर चोरली. पर्शियन जातीची महागडी अशी मांजर त्याने चोरल्याने पोलिसांनी या प्रियकराला अटक केली. नागपूरमधील मानकापूर येथील ही घटना आहे.

आरोपी तरुण आणि तरुणीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघंही नागपूरमधील ताजनगर येथे लिव्ह इनमध्ये राहत होते. कॅटरिंगच्या कामातून दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. हे दोघे राहत असलेल्या परिसरात डॉ. अंजुमन सय्यद हे राहतात. त्यांच्याकडे वेग-वगेळ्या प्रकारच्या अनेक मांजरी होत्या. आरोपी तरुणी रोज जाता-येताना या मांजरी पाहत होती. यामधील एक मांजर तरुणीला खूप आवडली आणि तिने प्रियकराकडे हट्ट धरला. प्रियकरानेही या मांजरीबाबत माहिती काढली, तर बाजारात या मांजरीची किंमत 30 हजार रुपये असल्याचे कळाले. मात्र इतके पैसे नसल्याने प्रियकराने अंजूमन यांची मांजर चोरली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

डॉ. अंजूमन हे कामावरुन घरी परतल्यावर त्यांना एक मांजर दिसली नाही. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रार दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही शोधले. यावरुन पोलिसांना संबंधित तरुणीवर संशय आला. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली. दोघांनीही मांजर चोरल्याचे नाकारले. यानंतर पोलिसांनी आपली खाकी दाखवत प्रियकराची कसून चौकशी केली असता, त्याने मांजर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी घरातील मांजर ताब्यात घेत प्रियसीलाही अटक केली.

पर्शियन मांजर  

सतराव्या शतकामध्ये इराणमधील लोक व्यापाराच्या निमित्ताने युरोपात घोड्यावरुन प्रवास करत असत. एकदा काही व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने युरोपमध्ये निघाले असताना त्यांना एक मांजर सापडली. व्यापाऱ्यांनी हे मांजर युरोपमध्ये नेले. इराणमध्ये म्हणजेच पर्शियनमध्ये सापडल्यामुळे लोकांनी या ब्रीडचे नाव पर्शियन असं ठेवले.

शुभ्र पांढरा, करडा, काळा, तपकिरी- पांढरा किंवा काळा, पांढरा, तपकिरी अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये पर्शियन मांजर पाहायला मिळते. शरीरयष्टी धष्टपुष्ट, संपूर्ण शरीरावर मऊ केस आणि चेहऱ्याचा विशिष्ट आकार यामुळे सामान्य मांजरांपेक्षा पर्शियन मांजर आकर्षक वाटते. या मांजरीची किंमत बाजारात 15 ते 30 हजार रुपये आहे.