गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात मोठा पुतळा! कधी होणार लोकार्पण, प्रमुख उपस्थिती कुणाची? राजकीय चर्चेला उधाण

| Updated on: Mar 17, 2023 | 9:17 AM

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा हा उभारण्यात आला असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात मोठा पुतळा! कधी होणार लोकार्पण, प्रमुख उपस्थिती कुणाची? राजकीय चर्चेला उधाण
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राज्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा हा नाशिकच्या नांदूर शिंगोटे येते साकारण्यात आला आहे. याच सर्वात मोठ्या स्मारक आणि सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. जवळपास सोळा फूट उंचीचा हा पुतळा आहे. यामध्ये मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत. भाजपाचं कधीकाळी राजकारण हे नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंढे यांच्या भोवती फिरत असल्याने दोन गट असल्याचे बोलले जायचे. त्यामुळे नितीन गडकरी या लोकार्पण सोहळ्यात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या ( शनिवार, 18 मार्च ) हा सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

या सोहळ्याला जवळपास 50 हजार नागरिक उपस्थित राहतील असा योजकांचा अंदाज आहे. दरम्यान या कार्यक्रमाला इतर नेतेही उपस्थित राहणार आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती असणार आहे.

एका तळ्यात हे स्मारक करण्यात आले आहे. दोन एकर यासाठी जागा लागली आहे. आकर्षक असे स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंढे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. 16 फुट उंचीचा हा पुतळा आहे. हा संपूर्ण पुतळा ब्रांझचा असून संपूर्ण दोन एकर तळ्याला आकर्षक असे रूप देण्यात आले आहे.

या संपूर्ण स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे. स्मारकाच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. उद्यान तयार करण्यात आले आहे. उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे करण्यात आले असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.

एक दिवस लोक नेत्यासाठी या नावाखाली गावागावात बैठका घेण्यात आल्या असून 100 हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी राज्यभर बैठका घेण्यात आल्या आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोकं या सोहळ्याला उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांना आहे. यामध्ये विशेष म्हणजे नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर असणार आहे. त्यामुळे दोन्ही नेते काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे.